वाहतुकीतील बेशिस्तीला 22 मे पासून बसणार चाप : 13 ठिकाणी सीसीटीव्ही सिग्नल प्रणाली कार्यरत
पणजी : आतापर्यंत वाहतूक पोलिसांचा दोळा चुकवून त्यांच्या ’हातावर तुरी’ देत पळणाऱ्या वाहनचालकांना यापुढे तसे करता येणार नाही. त्यांच्यावर आता पोलिसांचा नव्हे तर सीसीटीव्ही प्रणित सिग्नल प्रणालीचा दोळा असणार आहे. एवढेच नव्हे तर ’तुरी’ देणाऱ्यांच्या हाती ’चलन’ देण्याचे कामही हे कॅमेरेच करणार आहेत. त्यामुळे येत्या 22 मे पासून ’गुह्याला माफी नाही’ अशीच स्थिती राज्यात असणार आहे. एवढी वर्षे आरटीओ वा वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची बेशिस्ती आणि तत्संबंधी गुन्हे सौम्य पद्धतीने हाताळले असतील. यापुढे मात्र तसे घडणार नाही. येत्या 22 मे पासून तर ’गुह्याला माफी नाही’ अशीच स्थिती राज्यात असणार आहे. कारण वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम स्मार्ट कॅमेरे ठेवणार असून चलनही तेच देणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी कायद्याचे काटेकोर पालन करून अत्यंत सावधतेने वाहने चालविणे त्यांच्याच हिताचे ठरणार आहे.
राज्यात या महिन्यापासून वाहतूक नियमांची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी इंटेग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तिसवाडी आणि बार्देश तालुक्यात एकुण 13 ठिकाणी सीसीटीव्ही प्रणित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून तेथील कॅमेरे अखंड 24 तास वाहतुकीवर दोळा ठेवणार आहे. तिसवाडी तालुक्यात दिवजा सर्कल, कस्टम हाऊस जंक्शन, फेरीबोट जंक्शन, कला अकादमी, मिरामार सायन्स सेंटर, ताळगाव भागात सेंट मायकल स्कूल, गोवा विद्यापीठ-दोना पावला मार्ग, मेरशी जंक्शन, तर बार्देश तालुक्यात पेन्ह द फ्रान्स जंक्शन, मालीम जंक्शन, हिरो होंडा जंक्श्न-पर्वरी, तीन बिल्डिंग पर्वरी, ओ कोकेरो जंक्शन पर्वरी, अॅकडील स्कूल जंक्शन (डेफोडिल्स जंक्शन – पणजी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर) आदी ठिकाणी ही यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीत प्रवेश-ओव्हरटेक करणे, यासारख्या वाहतूक उल्लंघने सदर कॅमेरे टिपणार असून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या अशा चालकांच्या मोबाईलवर लगेच ई-चलन पाठविण्यात येणार आहे. मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 136 अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.









