माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन : गर्लगुंजी येथे अंजली निंबाळकर यांची प्रचारसभा
खानापूर : खानापूर तालुक्यातील समस्या, अडचणी, लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडणाऱ्या तसेच विरोधी पक्षांच्या विरोधात रणरागिणीसारख्या लढणाऱ्या अंजली निंबाळकर या विकासाभिमुख कार्याने प्रेरित होऊन तुमच्यासाठी सतत कार्यशील आहेत. देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता येणे आवश्यक आहे. देशात आज दडपशाहीचे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यात बदल करायची ताकद तुमच्या मतदानात आहे. सर्व मतदारांनी काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गर्लगुंजी येथे काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारसभेत केले. गर्लगुंजी येथे सकाळी काँग्रेसची भव्य प्रचाररॅली काढण्यात आली. सुरुवातीला विठ्ठल मंदिरात पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. गर्लगुंजी, पाटील गल्ली, देसाई गल्ली, कदम गल्ली येथून मुख्य चौकात सभा घेण्यात आली.
अशोक चव्हाण बोलताना म्हणाले, डबल इंजीन सरकार म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या मोदींना समजून आलेले आहे, समोरचं इंजीन खराब झालेले आहे. मागील इंजिनाच्या माध्यमातून धक्के देऊन चाललेले हे कर्नाटक सरकार आहे. विकास विकास म्हणत देशाचा भकास झालेला आहे. देशात सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेस सरकार असताना सर्वसामान्यांचा विचार करून योजना राबविण्यात येत होत्या. सर्वांना स्वातंत्र्यात जगण्याचा अधिकार होता. मत मांडण्याचा अधिकार होता. आज मात्र परिस्थिती पूर्ण उलटली असून सत्तेविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जातो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाच्या तसेच लोकशाहीच्या रक्षणासाठी सत्तेविरोधात आवाज उठवितात. त्यावेळी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांची खासदारकी रद्द केली. घरही खाली करायला लावले. तर सामान्य माणसांचे जगणे भाजपचे नेतृत्व निश्चितच हिरावून घेऊ शकते. सर्वच जातींना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत ठेवून कुठल्याच समाजाच्या भल्यासाठी काहीही केलेले नाही. यासाठी सामान्य माणसांनी आपल्या संरक्षणासाठी, अधिकारासाठी काँग्रेसला साथ दिली पाहिजे. यासाठी काँग्रेसला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अंजली निंबाळकर म्हणाल्या, मी राजकारणापेक्षा विकासकामांवरच पाच वर्षांत भर दिलेला आहे. भाजप सरकार जाणीवपूर्वक आडमुठे धोरण राबवत होते. तरी विधानसभेत आवाज उठवून तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. यात गर्लगुंजीसाठी बसस्थानक, शाळा, बेळगाव-गर्लगुंजी रस्ता यासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून दिला. गर्लगुंजी परिसरातील राहिलेला विकास निश्चितच पुढील पाच वर्षात केला जाईल. यासाठी मतदारांनी मतदान करून विजयी करावे, असे आवाहन केले. गर्लगुंजी ग्रा. पं. चे सदस्य प्रसाद पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अमर राठोड, राजू नाईक, रामचंद्र पाटील, जोतिबा गुरव, नवनाथ होसूरकर, प्रमोद सुतार, रामा पाटील, महांतेश कल्याणी, अनिल सुतार, यल्लाप्पा लोहार, शाम पाटील, शकील बुरुड, सोमनाथ पाटील, अजय कोलकार, जोतिबा सुतार, अभिषेक होसमणी, अलोक वागळे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









