सांबरा, निलजी, गणेशपूर भागात भव्य प्रचार : प्रचारफेरीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. शुक्रवारी पूर्व भागातील सांबरा, निलजी, बसरीकट्टी, सुळेभावी तसेच विजयनगर (हिं), गणेशपूर, ज्योतीनगर आदी गावांमध्ये मनोळकर यांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा काढून बेळगाव ग्रामीणच्या सर्वांगीण विकासासाठी मनोळकर यांनाच विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनोळकरांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशभरात विविध विकासकामे राबवून गोरगरीब जनतेचा कायापालट केला आहे. विविध उद्योगधंद्यांची निर्मिती करून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक गाव आणि शहर हायटेक बनविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. असाच विकास बेळगाव ग्रामीण मतदारसंघातदेखील करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या 10 रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही आमिषाला बळी न पडता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपच्या उमेदवारांनाच विजयी करा, असे आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना करण्यात आले. मतदारांनीही नागेश मनोळकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून, प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पदयात्रेदरम्यान मनोळकर यांचे सुवासिनींनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. तर युवावर्गाने फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य स्वागत केले. य् ाावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









