समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचे प्रतिपादन : मण्णूरमध्ये घडले मराठी अस्मितेचे विराट दर्शन
वार्ताहर /हिंडलगा
‘मी ही निवडणूक पैसे कमविण्यासाठी लढवत नसून सीमाभागातील मराठी भाषेवर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी, गोर-गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला बळकटी मिळावी यासाठी लढवत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रत्येक अडी-अडचणीत फक्त आणि फक्त समितीच पुढाकार घेते. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार मोठमोठी आश्वासने देत भेटवस्तू आणि पैशांचे वाटप करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता ही निकराची लढाई जिंकण्यासाठी म. ए. समितीच्याच पाठीशी राहून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले. त्यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी मण्णूर येथे भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.
याप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपविण्यासाठी कर्नाटक सरकार अतोनात प्रयत्न करत आहे. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी समस्त मराठी बांधवांनी एकजुटीने लढण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय पक्षातील उमेदवार मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी सर्वकाही आपणच देत असल्याचा आव आणत आहेत. पण, जनता आता सुज्ञ झाली असून मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवेल. त्यासाठी पाचशे, हजार रुपयांच्या मागे लागून स्वाभिमान गहाण न ठेवता समितीलाच मतदान करून महाराष्ट्रात जाण्याची प्रबळ इच्छा दाखवून द्यावी, असे आवाहन केले. प्रारंभी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौगुले यांचे ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन झाल्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. गावातील छ. शिवाजी चौक, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्लीमार्गे गावात प्रचारफेरी काढून चौगुले यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, अॅड. सुधीर चव्हाण, मदन बामणे, जि. पं. माजी सदस्या प्रेमा मोरे, माधुरी हेगडे, अनंत तुडयेकर, शिवाजी राक्षे यांच्यासह पदाधिकारी, ग्रा. पं. सदस्य, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज कंग्राळी खुर्द, बेनकनहळ्ळी परिसरात प्रचार
शनिवार दि. 6 रोजी सकाळी 7 वा. आर. एम. चौगुले यांचा प्रचार कंग्राळी खुर्द, ज्योतीनगर व रामनगर परिसरात होणार आहे. तर सायंकाळी 5 वा. बेनकनहळ्ळी, कोनेवाडी व सुळगा (हिं.) या गावामध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









