शिवारात रिकाम्या बाटल्यांचा खच, शेतकऱ्यांना इजा पोचण्याची शक्यता : पोलिसांची गस्त वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : निवडणुकीमुळे ओल्या पार्ट्यांना ऊत आला आहे. विशेषत: पार्ट्यांसाठी शहरालगतच्या शेतीला पसंती दिली जात आहे. मात्र तळीराम मद्य ढोसून रिकाम्या बाटल्या शिवारातच फेकून फोडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. जसजशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतसे मतदारांना खूष करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागात पार्ट्यांसाठी शेतीवाडीची निवड केली जात आहे. दरम्यान मद्य ढोसून रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आणि इतर टाकाऊ पदार्थ त्याठिकाणी टाकले जात आहेत. त्यामुळे शिवारात कचरा निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: बाटल्या फेकून फोडल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या पायांना इजा होत आहेत.
मशागतीची कामे सावधगिरीनेच करा
खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकरी मशागत आणि पेरणीसाटी धडपड करू लागले आहेत. मात्र शिवारात टाकण्यात आलेल्या बाटल्या शेतकऱ्यांना धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीची कामे सावधगिरीनेच करावी लागत आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन रस्त्यापासून आत असलेल्या शिवारात केले जात आहे. तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ओल्या पार्ट्या आणि भेटवस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे शिवारात ओल्या पार्ट्यांना रंग चढू लागला आहे. मात्र मद्य ढोसून रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, पत्रावळ्या आणि इतर टाकावू पदार्थ जाग्यांवरच टाकले जात आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ लागला आहे. पार्ट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त वाढवून आशांवर आळा घालावा. अशी मागणी होऊ लागली आहे.
ओल्या पार्ट्यां करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
शिवारात फेकलेल्या बाटल्यांमुळे शेतकरी व जनावरांच्या पायांना जखमा होऊ लागल्या आहेत. निवडणुकीमुळे पार्ट्याना वेग आला आहे. मात्र याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. काहीजण दिवसाही झाडांचा आधार घेऊन मद्य ढोसू लागले आहेत आणि मद्यधुंद अवस्थेत रिकाम्या बाटल्या फेकून देत आहेत. काचेच्या बाटल्याचा चुराडा शिवारात विखुरल्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.









