असनोटीकर यांच्या भूमिकेमुळे भाजपला फटका तर काँग्रेसला लाभ होणार का?
कारवार : मतदानाची तारीख अगदीच तोंडावर आली असताना कारवार-अंकोला मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार ऊपाली नाईक यांना धडा शिकविण्यासाठी कारवारचे माजी मंत्री आनंद असनोटीकर पुढे सरसावले आहेत. गुऊवारी घडलेल्या नाट्यामय घडामोडीत असनोटीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार सतीश सैल यांच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली आहे. तसे पहायला गेल्यास 2008, 2013 आणि 2018 मधील निवडणुकीत असनोटीकर आणि सैल यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. 2023 मधील निवडणूक सैल काँग्रेसच्या तिकिटावर लढवित आहेत, तथापि कधी तळ्यात कधी मळ्यात असे धोरण अवलंबलेल्या असनोटीकर यांनी शेवटी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. असनोटीकर यांच्या धरसोडवृत्तीमुळे आणि अखेरच्या क्षणी रणांगणात उतरण्यापूर्वीच त्यांनी शस्त्रs उतरविल्याने त्यांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते. असनोटीकर यांची स्वत:ची अशी व्होट बँक आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या 1 लाख 56 हजार 527 मतदानापैकी 46275 इतकी मते मिळवून असनोटीकर दुसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. मतदारसंघात अधिक प्रभाव नसलेल्या निजद उमेदवारीवर निवडणूक लढवून असनोटीकर यांना दुसऱ्या स्थनावर समाधान मानावे लागले होते. यावेळी असनोटीकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते गोंधळून गेले होते. त्यामुळे असनोटीकर यावेळी कुणाला समर्थन देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, ऊपाली नाईक यांनी काल गौरीकेरी येथे आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी आपल्या भाषणात कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता आपल्या विरोधकांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते. ‘समझने वालोंको इशारा काफी है’ या म्हणीनुसार असनोटीकर यांनी काय समजून घ्यायचे ते समजून घेतले आणि ऊपाली नाईक यांच्या भाषणाला चोवीस तास होण्यापूर्वीच आपले समर्थन काँग्रेस उमेदवार सतीश सैल यांना जाहीर केले. शिवाय त्यांनी सैल यांच्या प्रचाराला वाहून घेतले आहे.
रुपाली नाईक यांच्या कार्यपद्धतीवर टीका
असनोटीकर यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना ऊपाली नाईक यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाईक यांना मतदान करण्याऐवजी सैल यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. शेवटी असनोटीकर यांनी ठोस भूमिका घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. असनोटीकर यांच्या भूमिकेमुळे भाजपला फटका तर काँग्रेसला लाभ होणार का? हे पाहण्यासाठी कांही वेळ थांबावे लागेल.









