बेळगाव : खरीप हंगाम जवळ येऊ लागला आहे. मात्र रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने चिंता वाढली आहे. गतवर्षी रासायनिक खताच्या किंमतीत वाढ झाली. अद्याप ती कमी झाली नाही. त्यामुळे यंदाचा खरीप हंगामदेखील शेतकऱ्यांना चिंताजनक ठरणार आहे. अद्याप वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यातच रासायनिक खताच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात विशेषत: भात, भुईमूग, सोयाबीन, बटाटा, कापूस, ज्वारीची पेरणी करतात. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खताची आवश्यकता असते. मात्र मागील वर्षापासून खतांचे दर वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. खताच्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.
दरवाढीची चिंता
नैसर्गिक संकटे, अनिश्चित पाऊस, किडीचा प्रादुर्भाव या संकटांना तोंड देत शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. त्यातच रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढत असल्याने शेती कशी करावी? असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे.
वळिवाच्या हुलकावणीमुळे चिंतेत भर
रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामात चांगले उत्पादन होईल, अशी आशा आहे. मात्र अद्याप वळिवाचा पत्ता नाही. त्यातच रासायनिक खताचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींसाठी शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात. मात्र अलीकडे बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे एकूण खर्चदेखील वाढू लागले आहेत.
बी-बियाणे वेळेत द्या
दरवर्षी ऐन पेरणी हंगामात खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. यासाठी रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये वेळेवर बी-बियाणे उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.









