जागतिक आरोगय संघटनेची मोठी घोषणा
► वृत्तसंस्था/ जीनिव्हा
कोरोनासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिली नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. यासंबंधी डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीच्या 15 व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
आपत्कालीन समितीची 15 वी बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोविड-19 ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून वगळण्यात आल्याची घोषणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य करण्यात आल्याची माहिती डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी दिली आहे.
30 जानेवारी 2020 रोजी कोरोना संकटाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आले होते. कोरोना अद्याप देखील जागतिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे डब्ल्यूएचओकडून म्हटले गेले आहे. कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आले होते तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोनाबाधित आढळले होते तर तेथील प्रशासनानुसार एकाचाही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षे उलटून गेल्यावर कोरोनाबळींचा आकडा 70 लाखापर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे सुमारे 2 कोटी लोकांना जीव गमवावा लागल्याचा आमचा अनुमान असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
मागील एक वर्षात कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घसरण पाहून कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या श्रेणीतून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे शाळांपासून कार्यालये बंद राहिली, अनेक लोक यादरम्यान तणाव अन् चिंतेला सामोरे गेले. कोरोना महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान पोहोचविल्याचे डब्ल्यूएचओकडून म्हटले गेले आहे.
कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणीतून हटविण्याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही. मागील आठवड्यातच कोरोना विषाणू दर तीन मिनिटांनी एक बळी घेत होता. अद्याप याचे नवे व्हेरियंट येत असल्याने सतर्क राहण्याची गरज असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.









