जीवा सवे जन्मे मृत्यू खेळ प्राक्तनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
हे म्हणण्याची वेळ एका मृत्यूच्या निमित्ताने प्रत्येकावर येत असतेच. फक्त आपण हे स्वीकारायला मात्र कधीच तयार नसतो. नुकताच माझ्या मैत्रिणीचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. तिच्या घरच्यांप्रमाणे आमची सर्वांची मनस्थिती अतिशय वाईट होती. दहाव्याला तरी तिचा आत्मा तिथे घोटाळेल असे सगळ्यांना वाटत होतं. कारण खूप लवकर ती गेली होती. पण दहाव्याला जे लोक गेले त्यांनी तिथले दृश्य पाहिलं त्याच्यावरून तिचा आत्मा कशातच अडकला नसावा असं वाटलं. समाधानाने आयुष्य जगण्याचा तो परिपाक असेलही.
एक कावळा शांतपणे आला तिथे मांडलेल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद अगदी सावकाशपणे तो घेत होता. तिथे बसलेले ब्राह्मण किंवा तिचे यजमान या पैकी कुणालाच तो घाबरत नव्हता. शेवटी तिच्या यजमानांनी भाताचा घास करून कावळ्याच्या पुढे धरल्यावर त्याने तो सुद्धा शांतपणे खाल्ला. हे सगळं पाहिल्यावर अचंबित व्हायला झालं.
जसजसा या घटनेचा मी विचार करू लागले तस तसे लक्षात आलं शरीर सोडलेला आत्मा आपल्या भोवताली म्हणजे ब्रम्हांडातच फिरत असतो. त्याला बघण्याची किंवा जाणवण्याची शक्ती असते ती या कावळ्यामध्ये. खरंतर झाडावर कावळ्यांबरोबरच चिमण्या, पोपट, कबूतरं, खारुताई, असे कितीतरी विविध पक्षी असतातच की पण ते कोणीच, या पिंडदानाकडे बघत नाहीत. असं का? तर कावळ्याला असलेला एकाक्ष सूक्ष्मातले सूक्ष्म बघण्याची शक्ती. त्या आत्मतत्त्वाला संदेश पोहोचवण्याचं काम करत असते. हे काम कावळ्याकडे देवानं दिले आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला फक्त कावळाच दिसतो. माणसाचं शरीर खरंतर पाच कोषांनी बनलेलं असतं. प्राणमयकोश, अन्नमयकोष, आनंदमयकोष, मनोमयकोष आणि ज्ञानमयकोष.
यातला अन्नमयकोष देहाचीच उपासना प्रत्यक्ष करत असल्याने या अन्नाच्या मार्गानेच तो आत्म्याच्या जास्त जवळ असतो. असं म्हणतात आपल्या सगळ्या वासना, इच्छाशक्ती या अन्नातूनच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ‘पिंडी तेच ब्रह्मांडी’ या उक्तीचा इथे अनुभव येतो या अन्नाच्या माध्यमातून आपण जेव्हा पिंड कावळ्यासमोर ठेवतो. तेव्हा त्या पिंडाला स्पर्श करून त्या पिंडाच्या मागच्या भावना आत्म्यापर्यंत पोहोचवायचं काम हा कावळाच करतो. त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, तिच्या आठवणी आपल्याला दु:ख निर्माण करतील असं मानून आपण टाळायचा प्रयत्न करण्यापेक्षा, ज्या ज्या कृतीतून त्या व्यक्तीला आनंद होईल या सगळ्या कृती आपण खरं म्हणजे आवर्जून केल्या पाहिजे. तिचं उत्तम गृहिणीपद, मदतीचा हात, सर्वांची काळजी घेणं, माणसं जपणं, नाती टिकवणे या सगळ्यातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींना, क्षणांना खरंतर पुन्हा पुन्हा भेटत असतो, जगत असतो. तिने स्पर्श केलेल्या वस्तू, भिंती, गाई, गुरं सजीव निर्जीव सगळेच निराधार झाल्यासारखे वाटतात. आपण फक्त व्यक्ती म्हणून स्वत:बद्दल त्या व्यक्तीच्या अनुषंगाने विचार करत असतो. जन्माला येताना अनेकांचे ऋण चुकवायला आलेलो आपण मृत्यूलासुद्धा सामोरे जाताना बऱ्याचशा गोष्टी बरोबर घेऊन जातो.
आपली वाईट कर्म, चांगली कर्म या सगळ्याची पोतडी जशी आधीची इथे संपते तशी पुढच्यासाठीसुद्धा आपण ती घेऊन निघालेला असतो. कोणत्या ना कोणत्या रूपात आपण पुन्हा जन्म घेत असतोच. आता आपला आणि गेलेल्या व्यक्तीचा ऋणानुबंध जेवढा होता तोच ऋणानुबंध, उत्तम कर्म करत आपण पुढेही न्यायचा असतो. आपण आपल्या आयुष्यात कोण जोडीदार असावा? कोण मित्र-मैत्रिणी असाव्यात? कोण नातेवाईक यावेत? किंवा कोण वैरी म्हणून जन्माला येईल? हे जसं आपल्या पूर्वजन्मानुसार ठरलेलं असतं, तसंच पुढच्या जन्मासाठी सुद्धा. या सगळ्यातून आपण आपल्या देहाची पालखी फक्त वहायची असते. बाकी तो परमात्मा सगळ्यांना त्या त्या वेळी पाठवत असतो आणि पुन्हा बोलवून घेत असतो. म्हणून आपण प्रत्येकाशी चांगल्या गोष्टींशी जोडले जाऊ, चांगल्याच आठवणी आपल्याबरोबर घेऊन जावू, याची पराकाष्ठा करायची. शेवटी सगळ्यात परमेश्वराचीच इच्छा असते तेच घडते आपण फक्त निमित्त ठरतो
इतकंच.








