21 वर्षीय युवकाकडून गोळीबार : 2 दिवसांमध्ये दुसरी घटना
वृत्तसंस्था/ बेलग्रेड
युरोपीय देश सर्बियाच्या म्लाडेनोवॅक शहरात गुरुवारी रात्री उशिरा एका कारचालक हल्लेखोराने रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. गोळीबारांनतर हल्लेखोर फरार झाला होता. अनेक तास शोध मोहीम राबविल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोर 21 वर्षीय असून त्याच्याकडून ऑटोमॅटिक गन हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

सर्बियामध्ये दोन दिवसांमध्ये गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 3 मे रोजी राजधानी बेलग्रेडच्या एका शाळात एका विद्यार्थ्याने गोळीबरार केला होता. या गोळीबारात एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर काही जण गंभीर जखमी झाले होते. गोळीबाराचे कृत्य 14 वर्षीय विद्यार्थ्याने केले होते. 7वीतील या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. आरोपी संबंधित शाळेचाच विद्यार्थी होता आणि गोळीबारानंतर पलायनाचा प्रयत्न त्याने केला होता. शाळेबाहेर त्याला अटक करण्यात आली होती. हल्ल्यात विद्यार्थ्यांसोबत काही शिक्षकही जखमी झाले होते.
सर्बियात गोळीबाराच्या घटना फारशा घडत नाहीत. परंतु अलिकडच्या काळात घडलेल्या या घटनांमुळे तेथील लोकांना धक्का बसला आहे. सर्बियात बंदूक बाळगण्याची अनुमती नाही. आरोपीने गन कुठून मिळविली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 2013 मध्ये सर्बियात गोळीबाराची एक घटना घडली होती आणि यात 14 जण मृत्युमुखी पडले होते. परंतु तेव्हा दोन गटांमधील वैमनस्यातून गोळीबार झाला होता.









