उच्च न्यायालयाचा प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने शुवक्रारी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटात काहीच आक्षेपार्ह नाही असे म्हणत न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हना देणाऱ्या 6 याचिका फेटाळल्या आहेत. न्यायाधीश एन. नागेश आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वीच प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहे.
द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यासह काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यास देशातील धार्मिक सौहार्द अन् सार्वजनिक शांततेला धक्का पोहोचणार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. न्यायाधीश ए.डी. जगदीश चंदिरा आणि सी. सरवनन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
अंतिम क्षणी ही मागणी करणे चुकीचे आहे. काही काळापूर्वी दाद मागितली असती तर आम्ही कुणाला तरी चित्रपट पाहून निर्णय घेण्यास सांगू शकलो असतो. तुम्ही देखील चित्रपट न पाहता येथे आला आहात असे मद्रास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले होते. द केरळ स्टोरी हा चित्रप इस्लामिक स्टेटमध्ये सामील झालेल्या केरळमधील युवतींवर आधारित आहे.









