पुणे / प्रतिनिधी :
व्यंगचित्र चितारण्यासाठी माझा हात दररोज शिवशिवतो खरा. पण, ती बैठक आणि शांतता मिळत नसल्याने व्यंगचित्र काढण्यासाठी वेळ मिळत नाही. माझी व्यंगचित्रे बऱ्याचदा भाषणातूनच बाहेर पडतात, अशी मार्मिक टिप्पणी व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
जागतिक व्यंगचित्रदिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय गरड, कार्टुनिस्ट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत या वेळी उपस्थित होते.
रत्नागिरीच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पुण्याला येणार होतो. चारुहास पंडित यांच्या निमंत्रणावरून इथे टोल भरायला आलो, अशी सुरुवात करून राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्र हा माझ्या आवडीचा विषय असल्याने येथे येणे स्वाभाविक होते. प्रभाकर झळके नाशिकहून येऊ शकतात, तर मला येणे भागच होते. कला आपल्याला जे दाखविते ते विलक्षण असते. खरे तर ही भाषण करण्याची वेळ नाही. मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. माझ्याकडून काय सहकार्य हवे, ते कार्टुनिस्ट कम्बाईन संस्थेने अगदी हक्काने सांगावे.