संतोष पाटील, कोल्हापूर
Kolhapur News : राजर्षी शाहू स्मृती शताब्दी निमित्ताने मागील वर्षी 6 मे रोजी शाहू छत्रपती मिलच्या जागेवर कृतज्ञता वर्षांरंभ कार्यक्रम झाला. पुढील वर्षभर राजर्षी शाहू यांच्या विचारांचा जागर कृतीतून होतील, ही शाहूप्रेमींची अपेक्षा मात्र शताब्दी वर्षात सपशेल फेल ठरली. स्मृती शताब्दी पर्व हे इव्हेन्ट वर्ष न होता कृतीपर्व करुन लोकराजाला खरी आदरांजली ठरली असती. कृतज्ञता पर्वाची सुरुवात आणि शेवट इव्हेंट स्वरुपात करुन जिल्हा प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली. प्रशासनाकडून शासनदरबारी पाठपुरावा करुन किमान राजर्षी शाहूंच्या नावाने ठोस काहीतरी होईल ही अपेक्षाच राहिली.
शाहू नगरी मुळचीच ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाची खाण आहे. मिलची जागेचा वापर पर्यटन तसेच करमणूकीचे केंद्र म्हणून नव्हे तर येथे शाहूंच्या स्मृतीचे ज्ञानमंदिर झाले पाहिजे. परवाच्या, कालच्या आणि आजच्या सत्ताधाऱ्यांकडून किमान स्मृती शताब्दी वर्षात यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी शाहूप्रेंमीची अपेक्षा आहे. यासाठी जिल्हाप्रशासनाने ठोस कृती कार्यक्रम आखून आवश्यक निधीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची गरज होती. कृतज्ञता पर्वांच्या सुरूवातीला आणि शेवटी शोबाजी करत भव्यदिव्य केल्याचा आभास निर्माण करण्यात मात्र जिल्हाप्रशासन यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया शाहूप्रेमींतून व्यक्त होत आहे.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे, राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकले पाहिजे. तरच विकासाची चाके योग्य दिशेला जातील. सर्वपक्षीय नेते मंडळी उठता बसता राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घेतात. शताब्दी स्मृती वर्षानिमित्ताने शाहू मिल जागेसह राजर्षींनी उभी केलेली ज्ञान मंदिरे, शिक्षण आणि उद्योगाची केंद्र याचे नुतनीकरणासह आधुनिकीकरण, सक्षमीकरणासाठी ठोस प्रयत्न आणि पाठपुरावा झाला असता तरी ती राजर्षींना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरली असती. कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न दाखवताना असो शाहू महाराजांची लोकोपयोग आणि समाजउन्नतीची धोरणं नजरेपुढे ठेवावी लागतील. कोल्हापूरसाठी एखादी लोकोपयोगी योजना राबवताना राजर्षी शाहू यांनी आजच्या घडीला कोणता दृष्टीकोन ठेवला असता, याचा विचार विकास आराखडा तयार करताना झाला पाहिजे. दुर्दैवाने तसा प्रयत्न सर्वपक्षीय नेतृत्वाकडून वा जिल्हाप्रशासनाकडून झाल्याचे उदाहरण नाही.
मोठं-मोठे भपकेबाज कार्यक्रम, त्यात अधिकाऱ्यांची पाठ थोपटणीचा कौतुक सोहळा, यातून आपणच कोल्हापूरचे कसे तारणहार आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, मनोरंजनाचा मुलामा आदी कार्यक्रमातच स्मृतीवर्ष सरले. शाहू राजाच्या नावाने मिलच्या जागेवर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करत उच्च तंत्र शिक्षणाचे केंद्र बनवले पाहिजे. एमआयटी, आयआयटीच्या तोडीची येथे संस्था झाली पाहिजे. त्यासाठी फक्त राजकारण्यांची प्रयत्न करावेत असे कुठे लिहिलेले नाही, शाहुनगरीत सेवा करायची मिळणे हे प्रशासनात भाग्याच समजल जात, या उपकृत भूमीकेतून प्रशासनाने पाठपुरावा का केला नाही ? मात्र, प्रशासन कौतुकसोहळ्यात अडकले. त्यामुळेच शताब्दी वर्षात ठोस काहीतरी होईल, ही शाहूप्रेमींची माफक अपेक्षेचाही भंग पावली. प्रशासनाने इव्हेंटबाजीला प्राधान्य दिल्यानेच कृतज्ञता स्मृती वर्ष समस्त शाहू प्रेंमींसह कोल्हापूकरांचा भ्रमनिरास करणारे ठरले.
काल आणि आजपण पोकळ घोषणा
आताच्या बाजारभावाने किमान सहाशे कोटी रुपये किंमत असलेल्या मिलच्या 27 एकर जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. 169 कोटींच्या प्रस्तावित स्मारकासाठी अर्थसंकल्पात दहा लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पुरवणी मागणीद्वारे आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरले. 2018च्या शाहू जयंती कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक व महिलांसाठी गारमेंट पार्क या गोष्टी विकसित करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील‘, अशी ग्वाही दिली होती. यानंतर कृतज्ञता सोहळा शुभारंभात सतेज पाटील यांनीही शाहूमिल जागा विकासाचे स्वप्न दाखवले. मागील वर्षभरात शाहू मिलची जागा खऱ्या अर्थाने शाहू महाराज यांचे स्मृतीचे ज्ञानमंदिर व्हावे, यासाठी राज्यकर्ते असोत वा जिल्हाप्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत.
कौतुकाची थाप काय कामाची ?
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त 6 मे 2022 पासून ‘कृतज्ञता पर्व‘ साजरे करण्याचा निर्णय झाला. हाती झाडू घेवून संबंधितांचे फोटोसेशन पार पडले. विविध प्रकारची प्रदर्शने आणि शाहीरी कलाचे सादरीकरण, शाहू स्मृती जागवणारी व्याख्याने हे उपक्रम पर्वणीच ठरले. यानिमित्ताने शाहू मिलच्या 27 एकरची जागा तब्बल 20 वर्षानंतर सर्वसामान्यांसाठी खुली झाली. करवीरकरांची पावले शाहुमिलकडे वळली. यानिमित्ताने राजर्षी शाहू यांच्या स्मृतीला उजाळा मिळाला. भव्य सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल तत्कालीन मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कौतूक केले. आमच्या जिह्यात त्यांना नेवू असेही म्हटले. याअर्थाने जिल्हाप्रशासनाच्या कतृत्वावर राजमुद्रेची मोहर उमठल्यासारखे होते. त्यानंतर शाहू मिलची जागा असो किंवा राजर्षी शाहू यांच्या जिह्यात खास विकास आराखडा असो यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा वा विशेष प्रयत्न झाल्याचे दिसलेच नाही.
Previous Articleगाळपासह साखर उत्पादनातही सहकारी कारखाने आघाडीवर
Next Article निवड समितिने फेटाळला शरद पवार यांचा राजीनामा









