बोरगाव येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
वार्ताहर /निपाणी
देशाचा सर्वांगीण विकास साधताना केंद्र व राज्य पातळीवरील भाजप सरकारांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात इथेनॉल उत्पादनातून देश व शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य द्यावे लागेल, तरच देशातील इंधन संकट आटोक्यात येऊ शकते. त्यानुसार सरकार नियोजन करत आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना गेल्या 10 वर्षात मंत्री शशिकला जोल्ले यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. मतदारांचे हित जोपासण्यासाठी मंत्री जोल्ले यंदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांचा 101 टक्के विजय निश्चित आहे. मतदारसंघाचा गतिमान विकास व्हायचा असेल तर लोकप्रतिनिधी योग्य असावा लागतो. मंत्री शशिकला जोल्ले या निपाणी विधानसभा मतदारसंघासाठी योग्य लोकप्रतिनिधी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथे भाजप उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपचडे यांनी केले. प्रचारसभेला निपाणी मतदारसंघातील बहुसंख्य भाजप कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी अलोट गर्दी केली होती.
जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन
मंत्री गडकरी पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेती विकासाला गती मिळू लागली आहे. देशाला 280 लाख टन साखरेची गरज असताना उत्पादन मात्र 360 लाख टन होते. 60 लाख टन यंदा अधिकचे साखर उत्पादन झाले असून 140 लाख टन साखर शिल्लक राहिली आहे. असे असले तरी यंदा ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्याने ऊस उत्पादक व कारखानदार खुश आहेत. दुष्काळ पडला नसता तर साखरेचा भाव 24 ऊपयांवर आला असता. ऊस उत्पादकांना समृद्ध करण्यासाठी इथेनॉल निर्मिती महत्त्वाची आहे. पेट्रोलमध्ये 26 टक्के इथेनॉल टाकले तरी चालते. त्यामुळे येत्या दिवसात इथेनॉलला पर्याय राहणार नाही. भाजपचे सरकार केंद्रामध्ये सत्तेत येताच पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय झाला आहे. मका, तांदूळ, बांबू, बगॅस पासून इथेनॉल निर्माण करता येते. इथेनॉल वापरामुळे पेट्रोल हद्दपार होण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. येत्या दिवसांत फ्लेक्स इंजिन म्हणजेच 100 टक्के इथेनॉलचा वापर होणारी वाहने रस्त्यावर फिरताना दिसतील. त्यामुळे पेट्रोलचा भाव अवघा 25 ऊ. लिटर होईल. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. काही दिवसात पंपही सुरू झाल्यास तेथे तऊणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. बायो सीएनजी देखील तयार होऊ लागले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलला चांगला पर्याय निर्माण होत आहे. स्पेंट वॉश निर्मितीमुळे पोटॅश आयात करावे लागणार नाही. खराब पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याची योजना देखील केंद्र शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे हायड्रोजनवर चालणारी वाहने रस्त्यावर फिरू लागतील. त्याचे श्रेय तमाम जनतेला जाते, असेही त्यांनी सांगितले.
सध्या महामार्ग ऊंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे. नवे उद्योग आणि कारखाने उभारणीतून कर्नाटक राज्य सुखकर आणि संपन्न होत आहे. जातीपातीचे राजकारण भाजपने कधीच केले नाही. देश समृद्ध व संपन्न व्हायचा असेल तर गावा-गावातील गरीब देखील समृद्ध व्हायला पाहिजे. दिवंगत पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात आली. यातून साडेचार लाख गावांचे रस्ते जोडले गेले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, असे सांगितले. मंत्री शशिकला जोल्ले यांना तिसऱ्यांदा बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, पाशा पटेल, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक रामगोंडा पाटील, जयकुमार खोत, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष अभय मानवी, नगरसेवक शरद जंगटे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा सरोजनी जमदाडे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा प्रा. विभावरी खांडके, वृषभ जैन यांच्यासह मान्यवर, भाजप कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होत्या. विजय राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
मतदारांवर माझा पूर्ण विश्वास
निपाणी मतदारसंघातील माझ्या आई, वडील, भाऊ, बहिणींनी मला दोनवेळा मतांच्या माध्यमातून विकासकामे राबविण्याची संधी दिली आहे. त्यातून मतदारसंघाचा कायापालट करणे शक्य झाले. यापुढे मतदारसंघ राज्यात मॉडेल व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा बहुमताने मला मतदार विजयी करणारच यात शंका नाही. दि. 10 रोजी कमळ चिन्हा समोरील बटण दाबून माझा विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन उमेदवार तथा मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. खासदार धनंजय महाडिक, राहुल आवारे यांनी मनोगतातून मंत्री शशिकला जोल्ले यांचा विजय निश्चित आहे. आपण 13 रोजी गुलालाची उधळण करायचीच आहे, असे सांगितले.









