वृत्तसंस्था/ लखनौ
येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्याकरिता यापूर्वीच भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान या संघात समावेश झालेले काही क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत खेळताना जखमी झाल्याने या संघासमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियशिप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी अंतिम फेरी गाठली आहे. आता उभय संघातील अंतिम सामना 7 जून रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय कसोटी संघात समावेश असलेल्या केएल राहुल आणि जयदेव उनादकट यांना आयपीएल स्पर्धेत खेळताना दुखापती झाल्या असल्याने भारतीय संघासमोर पुन्हा नवी समस्या निर्माण झाली आहे. केएल राहुलच्या पायाला दुखापत झाली असून उनादकटला खांदा दुखापतची समस्या सरावावेळी झाली होती. आता हे दोन्ही खेळाडू इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध होतील किंवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तंदुरुस्ती समस्येमुळे निवडण्यात आलेल्या भारतीय कसोटी संघामध्ये जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आलेला नाहे. तसेच यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश असल्याने भारतीय संघासमोर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये अनुभवी हॅझलवूडचा समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याला दुखापतीने त्रासले होते. या दुखापतीतून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), गिल, पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहमद शमी, मोहमद सिराज, उमेश यादव आणि उनादकट.









