2 दिवसांसाठी रोखण्यात आले फ्लाइट बुकिंग ः एअरलाइनची निम्म्याहून अधिक विमाने जमिनीवरच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रोकडटंचाईला सामोरी जाणारी एअरलाइन गो फर्स्ट दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. कंपनीने पुढील दोन दिवस म्हणजेच 3 आणि 4 मे रोजीसाठी बुकिंग बंद केले आहे. इंधन कंपन्यांना देयक अदा न करता आल्याने एअरलाइन्सने हा निर्णय घेतला आहे. गो फर्स्ट कॅश अँड कॅरी मोडमध्ये स्वतःच्या फ्लाइट्स ऑपरेट करते. म्हणजेच एअरलाइन्सला दर दिनाच्या हिशेबानुसार जितकी उड्डाणे करायची असतात, त्यानुसार इंधनासाठी पेमेंट करावे लागते.
एअरलाइनने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये स्वैच्छिक दिवाळखोरी तोडगा कार्यवाहीसाठी एक अर्जही सादर केला आहे. इंजिन्सचा पुरवठा होऊ न शकल्याने एअरलाइनने 58 विमानांना ग्राउंडेड केले आहे, यातून निधीची कमतरता निर्माण झाली आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय दुर्दैवी आहे, परंतु कंपनीच्या हितांचे रक्षण करण्यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे एअरलाइन प्रमुख कौशिक खोना यांनी सांगितले आहे. एअरलाइनने या घटनाक्रमाबद्दल सरकारला कळविले आहे. तसेच कंपनी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला (डीजीसीए) एक विस्तृत अहवाल सोपविणार आहे.
इंजिन्सचा पुरवठा न झाल्याने समस्या
इंजिन्सच्या पुरवठय़ाशी संबंधित समस्येमुळे एअरलाइन या स्थितीत पोहोचली आहे. एअरक्राफ्ट इंजिन निर्माता प्रॅट अँड व्हिटनी कंपनी गो फर्स्टला इंजिन्सचा पुरवठा करणार होती. परंतु या इंजिन्सचा वेळेत पुरवठा होऊ शकला नाही. अशा स्थितीत गो फस्टंला स्वतःच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक विमानांना उड्डाणापासून रोखावे लागले आहे. विमानसेवा रोखावी लागल्याने निधीची समस्या कंपनीसमोर उभी राहिली. इंधन भरण्यासारख्या दैनंदिन कार्याकरताही पैसे कंपनीकडे शिल्लक राहिले नाहीत.
गो फर्स्टसोबत पीडब्ल्यूचा करार
करारानुसार विमानाचे इंजिन खराब झाल्यास पीडब्ल्यू कंपनीला 48 तासांमध्ये स्पेयर इंजिन द्यावे लागणार आहे. त्रुटीपूर्ण इंजिन्सची मोफत दुरुस्ती करून देण्याचे बंधन पीडब्ल्यूवर आहे. ग्राउंडेड विमानांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीडब्ल्यू कंपनीला द्यावी लागणार आहे. पीडब्ल्यूने मार्च 2020 पर्यंत वेळेत स्पेयर इंजिन उपलब्ध करविले होते, तसेच मोफत दुरुस्ती करून दिली होती. परंतु त्यानंतर एअरलाइनला काहीच मिळाले नाही. एअरलाइनने मागील वर्षी मार्चमध्ये एका आठवडय़ात 2,084 फ्लाइट्स ऑपरेट केल्या होत्या. विमाने ग्राउंडेड झाल्याने चालू वर्षातील मार्चपर्यंत हा आकडा कमी होत 1,642 वर आला आहे.
एअरलाइनची अमेरिकेच्या न्यायालयात याचिका
फ्लाइट्स ग्राउंडेड असल्याने मार्चमध्ये गो फर्स्टची बाजार हिस्सेदारी जानेवारीमध्ये 8.4 टक्क्यांवरून कमी होत 6.9 टक्के झाली आहे. एअरलाइनने यावरून अमेरिकेच्या डेलावेयर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंजिन्सचा मुदतीत पुरवठा करण्यात न आल्यास आम्ही दिवाळखोर होऊ असा दावा एअरलाइनने केला आहे.









