पाकिस्तानच्या एका न्यायालयात सुनावणी ः
वृत्तसंस्था / पेशावर
पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांच्या हवेलीवर (एकप्रकारचे मोठे घर) मालकी हक्क दर्शविणारी याचिका फेटाळली आहे. राज कपूरच्या या हवलेली 2016 मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने राष्ट्रीय वारसा घोषित केले होते. पेशावर उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हवेलीवर मालकी हक्क दर्शविणारी याचिका फेटाळली आहे. बॉलिवूडमधील प्रख्यात कपूर घराण्याची ही पिढीजात हवेली पेशावरमध्ये आहे. याच हवेतील पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांचा जन्म झाला होता.
पेशावर उच्च न्यायालयाने हा निर्णय अभिनेते दिलीप कुमार यांच्या हवेलीवर कब्जाशी निगडित एक आदेश विचारात घेत दिला आहे. दिलीप कुमार यांची ही हवेली पेशावरच्या लोकप्रिय किस्सा ख्वानी बाजारात आहे. या हवेलीला नवाज शरीफ सरकारने 2016 मध्येच राष्ट्रीय वारसास्थळाचा दर्जा दिला होता.
राज कपूर यांचे कुटुंबीय या हवेत राहिल्याचे कुठले पुरावे किंवा दस्तऐवज आहेत का अशी विचारणा न्यायाधीशांनी पुरातत्व खात्याला केली होती. तर याचिकाकर्ते सईद मुहम्मद यांच्या वकिलाने याचिकाकर्त्याच्या वडिलांनी 1969 मध्ये एका लिलावादरम्यान ही हवेली खरेदी केली होती असा युक्तिवाद केला.
राज कपूर यांची ही हवेली आता अत्यंत जर्जर अवस्थेत आहे. 40 ते 50 खोल्यांच्या 5मजली इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत. याचा वर्तमान मालक या हवेलीला पाडून एक कमर्शियल प्लाझा निर्माण करू पाहत आहे. तर पुरातत्व विभागाने याला विरोध दर्शविला आहे. या हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत हा वारसा जतन करण्याची इच्छा पुरातत्व विभागाची आहे.
पृथ्वीराज कपूर यांचे वडिल बशेश्वरनाथ कपूर यांनी 1918-22 दरम्यान या हवेलीची निर्मिती करविली होती. यात 40-50 खोल्या असून येथे राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता. 1990 मध्ये ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी या हवेलीला भेट दिली होती.









