नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या काळात नव्या 3,325 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मात्र, गेल्या आणि या आठवडय़ात आतापर्यंत प्रतिदिन रुग्णसंख्येत घट पहावयास मिळत आहे. उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्याही आता 3 हजारांनी कमी झाली असून 44,175 वर पोहचली आहे. याच कालावधीत 17 रुग्णांचा मृत्यू या विषाणूमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले.
दोन आठवडय़ांपूर्वी असणारा कोरोनाचा भर आता काहीसा ओसरला असल्याचे दिसते. तरीही लोकांनी दक्षता घेणे सुरुच ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्कचा उपयोग आणि शक्य तितके सामाजिक अंतर राखणे हे उपाय आणखी एक वर्ष सुरुच ठेवावे लागणार आहेत. कोरोना जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही, तो पर्यंत उपाय करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती तज्ञांनी केली आहे.
कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण आता 1.18 टक्के इतके कमी झालेले आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के इतके आहे. कोरोनाचा नवा विषाणू झपाटय़ाने पसरणारा असला तरी तो कमी जीवघेणा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साध्या उपचारांनीही रुग्ण बरे होत आहेत. मात्र, धोका अद्याप टळलेला नसल्याने लोकांनी अत्यंत सावध रहावे, अशी आवर्जून सूचना करण्यात येत आहे.









