कॅलिफोर्नियात घडली दुर्घटना
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया माउंटेन विमानतळानजीक एक इंजिन असलेले विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे. ए36 हे विमान बिग बियर सिटी विमानतळानजीक कोसळले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून आता दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. बिग बियर विमानतळ सॅन बर्नार्डिनो पर्वतात बिगर बियर सरोवरानजीक आहे. लॉस एंजिलिसपासून सुमारे 2 तासांच्या अंतरावरील हे एक लोकप्रिय रिसॉर्ट क्षेत्र आहे. दक्षिण कॅलिफोर्नियात तीन दिवसांमध्ये ही दुसरी विमान दुर्घटना घडली आहे. यापूर्वी शनिवारी लॉस एंजिलिसमध्ये विमान पर्वताला धडकल्याने एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी बोर्ड तपास करत आहे.









