अब्दुल जबर शाह झाला ठार
वृत्तसंस्था/ पेशावर
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा कमांडर अब्दुल जबर शाह मारला गेला आहे. अब्दुल जबर शाह हा पोलीस तसेच अन्य सुरक्षा दलांवर हल्ले करण्याप्रकरणी आरोपी होता. सोमवारी झालेल्या चकमकीत शाह मारला गेल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला आहे. या चकमकीत दोन अन्य दहशतवादी जखमी झाले आहेत. शाह हा टीटीपीसाठी खंडणीवसुली करत होता. पाकिस्तानचे सुरक्षा दल मागील अनेक महिन्यांपासून शाहच्या मागावर होते. दक्षिण वजीरिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शाहसोबत सुरक्षा दलांची चकमक झाली. पाकिस्तानची ही विशेष मोहीम शाहसाठीच हाती घेण्यात आली होती. टीटीपीने मागील काही महिन्यांमध्ये पाकिस्तानात अनेक हल्ले घडवून आणले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून टीटीपीचे बळ वाढले आहे. अशा स्थितीत ही दहशतवादी संघटना आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली आहे.









