गोगी गँगकडून हायसिक्युरिटी वॉर्डमध्ये हल्ला ः फिल्मी स्टाइल हत्येमुळे खळबळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील तिहार तुरुंगात मंगळवारी गँगस्टर सुनील उर्फ टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली आहे. जितेंद्र गोगी टोळीचे योगेश टुंडा, दीपक, राजेश आणि रियाज खानने मिळून ही हत्या केल्याची माहिती तुरुंग अधिकाऱयांनी दिली आहे. टिल्लू हा तुरुंगातील हायसिक्युरिटी वॉर्डमध्ये होता, त्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर टिल्लूला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिहार तुरुंगात एका महिन्यात दुसऱया गँगस्टरची हत्या झाली आहे.
टिल्लू हा रोहिणी न्यायालयात 24 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या चकमकीप्रकरणी आरोपी होता. टिल्लूच्या गँगच्या 2 सदस्यांनी जितेंद्र गोगीची न्यायालयात हत्या केली होती. दोन्ही मारेकऱयांना पोलिसांनी न्यायालयातच कंठस्नान घातले होते. योगेश टुंडा हा तिहारमध्ये तुरुंग क्रमांक 8 मध्ये कैद होता, हा तुरुंग पहिल्या मजल्यावर आहे. टिल्लू ताजपुरिया हा तळमजल्यावरील तुरुंग क्रमांक 9 मध्ये कैद होता.
गोगी गँगचे योगेश टुंडा आणि अन्य आरोपींनी मंगळवारी सकाळी स्वतःच्या वॉर्डचे सिक्युरिटी ग्रिल कापून बाहेर पडल्यावर बेडशीटचा वापर करत तळमजल्यावर उडी घेतली. तेथेच टिल्लूला हाय-सिक्युरिटी वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. गोगी गँगचे सदस्य टिल्लूच्या वॉर्डमध्ये लावण्यात आलेले ग्रिल कापून आत घुसले. गोगी गँगने धारदार अस्त्रांनी टिल्लूवर हल्ला केल्याची माहिती तुरुंग अधिकाऱयांनी दिली आहे.









