भाजप अन् काँग्रेस यांच्यात संगनमत असल्याचा आरोप ः
वृत्तसंस्था /कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावतात, तेव्हा काँग्रेसकडून त्याचे स्वागत केले जाते. तर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याची चौकशी झाल्यास तो पक्ष केंद्र सरकारवर तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप करू लागतो. तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पराभूत करण्यासाठी काँग्रेसने भाजपसोबत संगनमत केले असल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी केला आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखणार असल्याचे पश्चिम बंगालमधील सत्तारुढ पक्ष तृणमूल काँग्रेसने मागील महिन्यातच स्पष्ट केले होते. पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आव्हान निर्माण करण्यासाठी प्रादेशिक शक्तींना एकत्र आणण्याच्या दिशेने काम करणरा असल्याचे तृणमूल काँग्रेसकडून म्हटले गेले आहे. भाजपला केवळ तृणमूल काँग्रेसच पराभूत करू शकतो असा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.
स्वतःची चौकशी झाल्यास..
सीबीआय आणि ईडीकडून बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आल्यास काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचे कौतुक केले जाते. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यावर त्या पक्षाचे नेते तपास यंत्रणांच्या विरोधात आरोप करू लागतात अशी टीका अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे.
काँग्रेसला भाजपला विरोध नाही
काँग्रेस भाजपविरोधात लढणार असल्याचे म्हणत असतो. परंतु पश्चिम बंगालमध्ये याच्या उलट स्थिती दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसला विरोध करण्यासाठी काँग्रेस भाजप अन् डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी करत आहे. केवळ तृणमूल काँग्रेसला भाजपला रोखू शकतो असे विधान बॅनर्जी यांनी केले आहे. केवळ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस भाजपसमोर आव्हान निर्माण करू शकतो. मागील वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर आणि खाद्यतेलाचे दर कमी केले नव्हते. तर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये पराभव पत्करावा लागल्यावर भाजपला सिलिंडर आणि खाद्यतेलाच्या किमती कमी करणे भाग पडले आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये हाच फरक असल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे.









