वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी 1 मे रोजी महाराष्ट्रदिन व कामगार दिनानिमित्त बाजार बंद राहिला होता. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी वधारुन बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 242 अंकांनी वधारुन बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये एफएमसीजी वगळता बीएसईमधील सर्व क्षेत्रात तेजीची नोंद करण्यात आली. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 242.27 अंकांनी वधारुन निर्देशांक 61,354.71 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 82.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 18,147.65 वर बंद झाला आहे.
टेक महिंद्रा, एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक वधारले असून सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 तेजीत तर 14 घसरणीत राहिले आहेत. यामध्ये आयटी, धातू, तेल गॅस यांच्या समभागात खरेदीचा कल राहिल्याचे दिसून आले आहे. पॉवर, कंझ्युमर गुड्सच्या समभागात खरेदी राहिली. तर मिडकॅप व स्मॉलकॅपचे समभाग तेजीत राहिले होते.
‘अदानी टोटल’चा नफा वाढला
अदानी टोटल गॅसने मार्च 2023 च्या तिमाहीत आपला नफा हा वाढला असल्याचे सांगितले असून हा नफा जवळपास 21 टक्क्यांनी वधारुन 97.91 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे. 1 वर्षाच्या अगोदर समान कालावधीत हा नफा 81.09 कोटी रुपयावर राहिल्याची माहिती आहे. कंपनीचा महसूल 10.2 टक्क्यांनी वधारुन 1,114.8 कोटी रुपयावर पोहोचला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या कालावधीत पाहिल्यास 1,012 कोटी रुपये राहिल्याची माहिती आहे. संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2022ते 23 मध्ये 0.25 रुपये इतका प्रति समभाग डिव्हिडेंड देणार असल्याची शिफारस कंपनीने मंगळवारी केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा 2.86 टक्क्यांनी वधारले सोबतच एनटीपीस, टाटा स्टील, मारुती सुझुकी, इन्फोसिस आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. यासोबत अॅक्सिस बँक, टायटन, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये सनफार्माचे समभाग 1.45 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत.









