पत्राने केलेल्या तक्रारीचीही दखल : 50 पैकी 37 मोबाईल हस्तगत, 302 किलोमीटरची व्याप्ती, चोरीचा मोबाईल शोधणे तंत्रज्ञानामुळे सुलभ
बेळगाव : घाईगडबडीत हरवलेल्या बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याची प्रत्येकालाच डोकेदुखी असते. यातच रेल्वेत प्रवास करताना जर एखाद्या प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला तर तो शोधणे मोठे दिव्य असते. बेळगाव रेल्वे पोलिसांनी कमीत कमी मनुष्यबळ असूनही हे दिव्य पार केले आहे. दहा हजाराचा मोबाईल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांना उत्तर भारतातील अनेक राज्यांना जावे लागते. काळानुरुप रेल्वेतही सोयीसुविधा वाढल्या आहेत. रेल्वेत प्रवास करताना आपला मोबाईल चार्जिंगला लावता येतो. यासाठी प्लगची व्यवस्था असते. मात्र, चार्जिंगला लावला असताना किंवा प्रवासी झोपी गेला असताना मोबाईल चोरीचे प्रकार घडतात. गेल्या तीन वर्षांत एका बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 50 मोबाईल चोरीचे प्रकार घडले आहेत. यापैकी 37 मोबाईल्सचा शोध लावून पोलिसांनी ते संबंधितांना परत केले आहेत. 2020 मध्ये 17 मोबाईल चोरण्यात आले होते. यापैकी 14 पोलिसांनी शोधले आहेत. 2021 मध्ये मोबाईल चोरीच्या 15 घटना घडल्या होत्या. यापैकी 10 मोबाईल शोधण्यात आले. 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांचे 18 मोबाईल चोरण्यात आले होते. यापैकी 13 मोबाईलचा तपास लागला आहे. चालू वर्षी शनिवार दि. 29 एप्रिलपर्यंत मोबाईल चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. यापैकी एका मोबाईलचा पोलिसांनी शोध घेतला आहे. च् ााsरीचा मोबाईल शोधणे तंत्रज्ञानामुळे आणखी सुलभ झाले आहे. आता तर सीईआयआर तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा मोबाईल शोधता येतो किंवा तो पूर्णपणे निष्क्रिय करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पोलीस दलात सध्या याच तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधण्याचे काम हाती घेण्यात येते. 15 मार्चपर्यंत बेळगाव पोलिसांनी या तंत्रज्ञानाच्या मदतीने 18 चोरीचे मोबाईल शोधले आहेत. रेल्वे पोलीसही सध्या सीईआयआर तंत्रज्ञानाचा वापर करीत असले तरी मोबाईल ताब्यात घेण्यासाठी त्यांना थेट परराज्यातही पोहोचावे लागते. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, पंजाब, दिल्लीपर्यंत पोहोचून बेळगाव रेल्वे पोलिसांनी चोरीचे मोबाईल शोधले आहेत. रेल्वे पोलिसांच्या कामाची पद्धतही वेगळी आहे.
एखाद्या रेल्वे प्रवाशाचा मोबाईल किंवा किमती वस्तू हरवली, चोरीस गेली तर तातडीने उतरून पोलीस स्थानकात तक्रार करणे प्रवाशाला शक्य नसते. अनेक वेळा प्रवासी घरी पोहोचल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस येतो. अशावेळी पत्राच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करतात. सविस्तर माहिती व पत्त्यासह आलेल्या पत्राची दखल घेत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रेल्वे पोलीस करतात. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईलच्या पंधरा अंकी आयएमईआय नंबरवरून तो मोबाईल सध्या कोठे आहे? याची तांत्रिक विभागातून माहिती मिळविली जाते. चोरीच्या मोबाईलमध्ये सध्या कोणते सीमकार्ड आहे? आदी माहिती मिळाल्यानंतर पोलीस कामाला लागतात. रेल्वेत चोरलेल्या मोबाईलची विशेषत: परराज्यात विक्री केली जाते. उत्तर भारतातील एखाद्या शहरात त्याची विक्री झालेली असते. त्याची माहिती मिळवून रेल्वे पोलीस तेथपर्यंत पोहोचतात. संबंधितांना अटक करून मोबाईल जप्त करतात. सीईआयआर सेवा सुरू होण्याआधी हे काम जिकिरीचे होते. रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक एस. वेंकटेश, हवालदार संगाप्पा कोट्याळ, भीमशी नाईक, इरगंटप्पा तळकेरी, करुणाकर, मलिकसाब मुल्ला, पावाडी सरव आदी या कामात गुंतलेले असतात. रेल्वे पोलीस स्थानकात दाखविली जाणारी तत्परता मोबाईल चोरीच्या बाबतीत नागरी पोलीस स्थानकात दिसत नाही. रेल्वे पोलीस मात्र केवळ एखाद्या पत्रावरून मोबाईल चोरीचे प्रकरण हाताळतात. केवळ पत्रच नव्हे तर ई-मेलच्या माध्यमातूनही रेल्वे पोलिसांना चोरीच्या तक्रारी येत असतात. गेल्या तीन वर्षांत रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या 38 जणांना अटक केली आहे. यातील बहुतेक जण परप्रांतीय आहेत. रेल्वे पोलिसांची हद्दही काही कमी नाही. शेडबाळपासून नागरगाळीपर्यंत व गोव्याच्या सीमेपर्यंत तब्बल 302 किलोमीटरची हद्द बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते. घटप्रभा, लोंढा, कॅसलरॉक अशा तीन पोलीस आऊटपोस्ट आहेत. रेल्वे पोलिसात कमीत कमी मनुष्यबळ असूनही प्रत्येक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाते.
‘केएसपी’ (ई-लॉस्ट) अॅप्लिकेशनद्वारे तक्रार
सध्या सीईआयआरच्या माध्यमातून चोरीचा मोबाईल शोधला जातो. ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ हे तंत्रज्ञान चोरलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी प्रभावी ठरले आहे. मोबाईल चोरीनंतर आता तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्थानकातच जायला हवे असे नाही. ‘केएसपी’ (ई-लॉस्ट) अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही तक्रार नोंदविता येते.









