मतदगरसंघात डॉ. रवी पाटील यांचा जोरदार प्रचार : कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे भाजपचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी रविवारची पर्वणी साधत विविध भाग पिंजून काढत जोरदार प्रचार केला. आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत सकाळी 6.30 वा. श्रीनगर साई मंदिरजवळ त्यांनी ‘चाय पे चर्चा’ उपक्रम राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या. बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर सन्मान हॉटेल, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली, रामदेव गल्ली, केळकर बाग, किर्लोस्कर रोड, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली व इतर अनेक ठिकाणी प्रचार केला. डॉ. रवी पाटील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, लोकांचा आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा दिसून येत आहे. लोक स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत आहेत. राज्यात पुन्हा कमळ फुलणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे प्रसारमाध्यम समन्वयक शरद पाटील, रणजित रोकडे, बाबुराव कुट्रे, गोपाळ सांबरेकर आदी उपस्थित होते.
गोंधळी गल्लीत पुष्पवृष्टी
गोंधळी गल्ली येथे डॉ. रवी पाटील रविवारी प्रचाराला गेले असता नागरिकांनी जल्लोषात पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करून पाठिंबा दर्शविला. यावेळी गोंधळी गल्ली येथील गर्व हिंदू युवक मंडळ आणि रहिवाशांनीही पाठिंबा दर्शविल्याने डॉ. रवी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले तसेच सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर कायम असू दे, अशी आशा व्यक्त केली.
शिवाजीनगरमधूनही पाठिंबा
छत्रपती शिवाजीनगर येथे या भागातील नागरिकांसमवेत डॉ. रवी पाटील यांची बैठक पार पडली. बैठकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला डॉ. रवी पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर नागरिकांनी भागातील समस्येविषयी चर्चा केली आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर केळकर बागेतील सर्जिकल शॉपमध्ये केळकर बागेतील व्यवसायिकांची भेट घेवून चर्चा केली.
आजचा प्रचारमार्ग
रुक्मिणीनगर, आंबेडकर कॉलनी, रामतीर्थनगर, जनता कॉलनी वंटमुरी, चन्नम्मा सोसायटी श्रीनगर या ठिकाणी डॉ. रवी पाटील सकाळी प्रचार करणार आहेत. यानंतर फुलबाग गल्ली येथील दो•ण्णावर कॉम्प्लेक्समध्ये बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधून सायंकाळी रॅलीमध्ये भाग घेणार आहेत.
सुदीप यांचा आज रोड शो

सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते किच्चा सुदीप संजीव हे आज डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ बेळगावला येत आहेत. सायंकाळी 4.30 वाजता श्रीनगर येथून त्यांच्या रोड शोला प्रारंभ होणार असून श्रीनगर मार्गे साई मंदिर, दत्त मंदिर त्यानंतर महांतेशनगर येथील ग्लास हाऊसमध्ये या रोडशोची सांगता होणार आहे.









