उदरनिर्वाहासाठी 30 वर्षांपासून काबाडकष्ट : उदरनिर्वाहासाठी गाव सोडणे भाग पडले : नशीबाला दोष देत मन केले घट्ट
बेळगाव :
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटकाबाहेर कधी
फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
असे कवी नारायण सुर्वे यांनी म्हटले होते. आज ही कामगारांची हीच अवस्था दिसून येते. बेळगाव बाजारपेठेमध्ये हमाली करणाऱ्या कामगाराची ही व्यथा ऐकल्यानंतर नारायण सुर्वे यांची कविता आठविल्याशिवाय राहणार नाही. 1 मे कामगार दिन आहे. त्यानिमित्त बेळगाव बाजारपेठेतील एका हमालाची भेट घेऊन त्यांची जाणून घेतलेली व्यथा… घरची हलाखीची परिस्थिती त्यामुळे शिक्षण घेणे कठीणच झाले. पोटच भरत नव्हते तर शिक्षण कोठून मिळणार. त्यामुळे समोर केवळ दिसले ते काम. कामाशिवाय पर्याय नाही हे ओळखून चुकले. त्यामुळे बेळगाव गाठले. बेळगावात आल्यानंतर कामाची शोधाशोध केली. मात्र केवळ हमालीशिवाय पर्यायच नव्हता. हमाली म्हटले की, कमीपणा. सुरुवातीला थोडासा नशिबाला दोष देत निराश झालो. मात्र निश्चय केला व मन घट्ट करत हमाली कामाला सुरुवात केली. 74 वर्षांचा वृद्ध असूनही पोटासाठी हमाली करत असताना आता आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यातच पत्नीचीही देखभाल करावी लागत आहे. असे अत्यंत भावनिक होऊन सुभाष चव्हाण यांनी आपली व्यथा व्यक्त केली. कंग्राळी येथे एका भाडोत्री घरात त्यांनी वृद्ध पत्नीसह संसार थाटला आहे. पत्नी वृद्ध असल्याने घरीच असते. त्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. तशातच मुलांनीदेखील साथ सोडली आहे. त्यामुळे पत्नीला सोबत घेऊन गुजराण सुरू आहे. एकीकडे नोकरी नाही म्हणून तरुण आत्महत्या करताना दिसतात. तर दुसरीकडे सुभाष चव्हाण यांची वृद्धवयातील धडपड तरुणांना लाजवेल अशी आहे.
शहरातील कलमठ रोड, मारुती गल्ली, रविवार पेठ, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, रामलिंगखिंड गल्ली या बाजारपेठेत हमाली करत आपली धडपड सुरूच ठेवली आहे. पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्यच पणाला लावण्याची वेळ या हमालावर आली आहे. त्याची ही चाललेली धडपड काम नाही म्हणणाऱ्या तरुणांसाठी एक आदर्श आहे. मूळचे तेरणी (ता. गडहिंग्लज) व सध्या कंग्राळी के. एच. येथील वृद्ध सुभाष चव्हाण हे हाताला काम मिळत नसल्याने बेळगाव परिसरात दाखल झाले आणि त्यांच्या हमालीच्या कामाला सुरुवात झाली. मागील 30 वर्षांपासून ऊन-पावसाची तमा न बाळगता त्यांचे चाललेले कष्ट तरुणांना थक्क करणारे आहेत. सकाळी हातात घेतलेली हातगाडी रात्री उशिरापर्यंत चालते. बाजारपेठेत पिशव्या, बॉक्स आणि इतर साहित्य एका दुकानातून दुसऱ्या दुकानात पोहोचविणे आणि यातून मिळणाऱ्या पैशातून आपला प्रपंच चालविणे हा एकच ध्येय त्यांच्यासमोर आहे. मूळ गावी शेती-पाणी आणि घरदार नसल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी 30 वर्षांपूर्वी गाव सोडून कंग्राळीत स्थायिक झाले आणि पोटापाण्यासाठी हातगाडी हातात घेतली आणि यातूनच मिळणाऱ्या पैशातून आपल्या संसाराचा गाडा उभा केला. अशा परिस्थितीतही न डगमगता धीराने सामोरे जाऊन घरगाडा सुरू ठेवला. दैनंदिन हमालीच्या कामातून कधी 50-100 रुपये मिळतात तर कधी काहीच हाताला लागत नाही. त्यामुळे काहीवेळेला पुन्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो?
हक्काचे घर नसल्याने अडचण

मागील 30 वर्षापासून बाजारपेठेत हमालीचे काम करतो. गावी काहीच नसल्याने कामासाठी बेळगावला यावे लागले. व्यापारी, दुकानदारांशी चांगले संबंध निर्माण झाल्याने किरकोळ कामे मिळतात. त्यामुळे संसार चालतो. मात्र हक्काचे घर नसल्याने भाडोत्री घरातच रहावे लागते. शिवाय पत्नी वृद्ध असल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात.
– सुभाष चव्हाण, (वृद्ध हमाल)









