शंभराव्या भागात पंतप्रधानांच्या भावना ः लोकांनी पाठविलेली पत्रे वाचून भावुक झाल्याचीही कबुली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱया ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 30 एप्रिलला शंभरावा भाग होता. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूटय़ूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’चा 100 वा भाग पूर्ण केला. आजचा भाग टीव्ही चॅनेल, खासगी रेडिओ स्टेशन आणि कम्युनिटी रेडिओसह एक हजाराहून अधिक प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला. याशिवाय न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही आजचा भाग ऐकण्यात आला. 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीपासून सुरू झालेली ‘मन की बात’ आम्ही दर महिन्याला आयोजित करतो. ‘मन की बात’ हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे, असे मोदी म्हणाले.
शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रे वाचून माझे मन भावुक झाले. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझे अभिनंदन केले, पण हय़ा अभिनंदनासाठी ‘मन की बात’च श्रोतेच पात्र असल्याचे सांगत हय़ा ‘मन की बात’च्या शतकोत्सवाचे श्रेय जनतेला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण सांगितली. 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजयादशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे, असे मोदी म्हणाले. ‘मन की बात’मध्ये जनआंदोलनासारखी ताकद आहे. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचे मिशन ‘मन की बात’नेच सुरू झाल्याचे सांगत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.









