केदार शिंदेच्या चित्रपटाचा टीझर सादर
केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास मोठय़ा पडद्यावर उलगडण्यात आला आहे. या चित्रपटासोबत केदार शिंदे आणखी एक नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांला भेटीला येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून प्रत्येकीच्या आयुष्यात येणाऱया आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱयांच्या भावनांचं चित्रण दर्शविण्यात येणार आहे. या चित्रपटात 6 बहिणींची कहाणी दर्शविण्यात आली आहे. काही कारणांमुळे परस्परांपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या आयुष्यात वेगवेगळय़ा समस्यांना सामोऱया जाणाऱया या 6 बहिणींची ही कथा आहे.
हा चित्रपट महिलाकेंद्रीत असला तरीही याचे कथानक प्रत्येक पुरुषालाही बरेच काही सांगून जाणार आहे. समाजात स्वतःच्या पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया अनेक महिला आहेत, ज्यांच्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष होत असतं . ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील व्यक्तिरेखा अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.









