Kolhapur Bajar Samiti Election Result : कोल्हापूर बाजार समितीचा पहिला निकाल हाती आला आहे. हमाल मापाडी गटातून अपक्ष उमेदवार बाबुराव खोत 60 मतांनी विजयी झाले आहेत . तर व्यापारी गटातून विरोधी आघाडीचे नंदकुमार वळुंजू आणि सत्ताधारी गटाचे वैभव सावर्डेकर हे विजयी झाले आहेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज रविवार (ता. 30) रोजी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत, हमाल, व्यापारी गटातील मतमोजणी झाली. यानंतर विकास संस्था मतदार संघातील मतमोजणी होणार आहे.
बाजार समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवार 28 रोजी या 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-मापाडी अशा चार गटात मिळून 20 हजार 280 इतके मतदान झाले. मतदान प्रक्रीयेनतंर आज मतमोजणी होत आहे. मतमोजणीची तयारी निवडणुक विभागाने पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी 150 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 36 टेबलांवर मतमोजणी होईल.
पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-मापाडी या गटातील मतमोजणी होईल. हि मतमोजणी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण होईल असे नियोजन निवडणुक विभागाचे आहे. यानंतर विकास संस्था गटातील मतमोजणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत या गटातील मतमोजणी पूर्ण करुन निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. मतमोजणी स्थळावर पोलीस बंदोबस्त असून उमेदवार व प्रतिनिधी यांना ओळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जात आहे.
Previous Articleदांडेलीत प्रियांकांचा झंझावात
Next Article डॉ. प्रल्हाद मणचेकर यांना मातृशोक !









