गोवा फॉरवर्डची टीका : विजय सरदेसाईंनी केलेला ‘ड्रग्ज कार्टेल’चा आरोप खरा ठरला
प्रतिनिधी/ मडगाव
मुंबई येथील केंद्रीय अमलीपदार्थ विभागाच्या पथकाने हरमल येथे छापा मारून मोठ्या प्रमाणात चाललेली अमलीपदार्थांची टोळी उघडकीस आणली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील पोलिसांच्या डोळ्यांसमोर असे व्यवहार कसे बिनबोभाट चालू आहेत हे सिद्ध होते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.
यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्यात ‘ड्रग्ज कार्टेल’ चालू असून गोवा पोलीस त्यांच्यावर कसलीच कारवाई करत नाहीत असे म्हटले होते. त्यांचा हा आरोप खरा असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
यापूर्वी हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्ज डिलरना अटक केली होती. आता मुंबईच्या पथकाने कारवाई केली आहे. यावरून गोवा पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. एक तर गोव्यातील पोलीस अशा कारवाईच्या बाबतीत अकार्यक्षम आहेत किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात हे यातून सिद्ध होते, असे कामत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोव्यातील हे ड्रग्ज व्यवहार बंद करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा या बेकायदेशीर व्यवहारांतून त्यांना फायदा होत असावा. सरकारी आशीर्वाद असल्याशिवाय असे धंदे गोव्यात चालू राहणे शक्यच नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.









