निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारताच थांबली कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर परिसरातील घरांवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भगवे ध्वज आणि पताका हटविण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडून शनिवारी झाला. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना परिसरातील तरुणांनी चांगलेच धारेवर धरले. शिवजयंतीनिमित्त आम्ही हे भगवे ध्वज लावले आहेत. कोणत्याही पक्षाचा हा ध्वज नाही. तेव्हा हे कशासाठी काढले जात आहेत? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
म. ए. समितीच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे आता मराठी भाषिकांच्या घरांवरील भगवे ध्वज व पताका हटविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप या परिसरातील मराठी भाषिकांनी केला आहे. नगरसेवक रवि साळुंखे यांनी जोरदार आक्षेप घेतला. दक्षिण विभागाचे निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांना याबाबत फोनवर संपर्क साधून जाब विचारला. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने ही कारवाई थांबविली.
महानगरपालिकेचे कर्मचारी या परिसरात जाऊन ध्वज आणि पताका हटविण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय पक्षाचे ध्वज हटविणे बंधनकारक आहे. त्याबाबत नियमावली आहे. मात्र, भगवा ध्वज हा कोणत्याच राजकीय पक्षाचा नाही. तो एक त्यागाचे प्रतीक आहे. त्यामुळे भगवे ध्वज हटविणे हे बेकायदेशीर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.