वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील साकेत न्यायालयात श्र्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची सुनावणी 9 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी या प्रकरणात आफताब पूनावाला याच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते, परंतु न्यायाधीश रजेवर असल्याने ते पुढे ढकलण्यात आले. आता 9 मे रोजी न्यायाधीश आरोप निश्चित करणार आहेत. 14 एप्रिल रोजी न्यायालयाने आरोपांवरील आदेश राखून ठेवला होता.
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे अवशेष तिच्या वडिलांकडे सोपवण्याच्या मागणीवर दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागवण्यात आले आहे. दिल्ली पोलीस पुढील सुनावणीच्या तारखेला श्र्रद्धाच्या वडिलांच्या अर्जावर उत्तर दाखल करतील. जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत श्राद्धाचा अंत्यविधी न करण्याचा निर्धार श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केले आहे.
आफताबवर मे 2022 मध्ये त्याची लिव्ह-इन पार्टनर श्र्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 12 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. 24 जानेवारी रोजी पोलिसांनी या प्रकरणी आफताबविऊद्ध 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान, दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को आणि पॉलीग्राफ चाचणी केली असून त्यामध्ये त्याने श्र्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी दीडशेहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पोलिसांनी आफताबच्या आवाजाचे नमुनेही रेकॉर्ड केले होते.









