पुणे / वार्ताहर :
पुण्यातील सराईत गुंड अजय विटकर याच्यासह त्याच्या 28 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे.
रुपेश उत्तम विटकर (वय 22), इस्माईल इब्राहिम शेख (19), गणेश हरिश्चंद्र धोत्रे (19), साहिल गणेश विटकर (20), लवकुश रामाधीन चव्हाण (20), विजय हनुमंता विटकर (21), चेतन राजू पवार (22), अनिल हनुमंत डोंगरे (21), विजय चंद्रकांत विटकर (19), धनराज काळूराम धोत्रे (23, सर्व रा. वडारवाडी, पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 20 ते 22 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अजय विटकर आणि त्याच्या साथीदारांनी संघटित टोळी तयार करून पुण्यातील पीएमसी परिसरात आम्ही इथले भाई असल्याचे सांगत 14 दुचाकी व चार चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी या टोळीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली.
जबरी चोरी करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, नागरिकांच्या मालमत्तेची तोडफोड करणे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.









