ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या फेर मतमोजणीवरुन माजी आमदार अनिल कदम आणि अपक्ष उमेदवार यतीन कदम आमने-सामने आले. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात राडा घातला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट होतं आहेत. अशातच पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत फेर मतमोजणीच्या मुद्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाले होते. याच मुद्यावरुन ते माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर धावून गेल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादात अनिल कदम मध्यस्थी झाले. मात्र, वाद विकोपाला गेल्याने त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.