पुणे / प्रतिनिधी :
सध्या एल निनो व इंडियन ओशन डायपोल (आयओडी) या दोन्हीची स्थिती तटस्थ आहे. मात्र, मान्सूनच्या कालावधीत एल निनो विकसित होणार आहे, तर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्हकडे झुकण्याचा अंदाज आहे. आयओडी पॉझिटिव्ह असतानाच्या काळात मान्सून दमदार बरसला असल्याचा दाखला देत यंदा मान्सून सर्वसामान्य राहण्याचा पुनरुच्चार भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहोपात्रा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, यंदा महाराष्ट्र, राजस्थान या भागात हिट वेव्हचे प्रमाण कमी राहणार असून, पूर्वेकडील राज्यात याचा प्रभाव अधिक राहील. मेच्या दुसऱया आठवडय़ानंतर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होईल. तसेच मे महिन्यात कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजही त्यांनी या वेळी वर्तविला.
डॉ. मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत एप्रिल महिन्याचा आढावा तसेच मे महिन्यातील देशातील हवामान स्थितीवर भाष्य केले. एप्रिल महिन्यात मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पश्चिम प्रक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) तसेच बंगालचा उपसागर व अरबी समुदातून येणाऱ्या बाष्पामुळे मध्य भारतात एप्रिलच्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. मेच्या पहिल्या (4 मे) आठवडय़ापर्यंत देशभर चांगला पाऊस राहणार आहे. त्यानंतर मात्र उन्हाचा कडाका वाढणार आहे.
कमाल तापमान वाढणारी राज्ये
मे महिन्यात पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, पूर्व आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्वोत्तर भारताचा काही भाग, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र किनारपट्टी, विदर्भाचा काही, दक्षिण कर्नाटकच्या काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
उष्णतेचा लाटेचा तडाखा बसणारी राज्ये
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र किनारपट्टी, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेश, दक्षिण गुजरातच्या भागात यंदा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहत हिट वेव्हचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
यावर्षी पूर्व भारत तापणार
दरवर्षी वायव्य भारतात कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येते. या भागात उष्णतेची लाटही अधिक असते. यंदा मात्र, चित्र उलटे आहे. एप्रिल तसेच मे महिन्यात पश्चिम प्रक्षोभाचा प्रभाव तसेच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने या भागात कमाल तापमान सरासरीइतके राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे उष्णतेच्या लाटेची शक्यताही तुरळक आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र/द्रोणीय स्थिती कमी निर्माण झाली. यामुळे या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढली. त्यामुळे या भागात मे महिन्यातही कमाल तापमान अधिक राहण्याची चिन्हे आहेत.
कोकण तापणार
कोकण किनारपट्टी तसेच विदर्भाच्या काही भागात मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. किमान तापमानही महाराष्ट्रात सरासरीच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे यंदा राज्यात तुलनेत उन्हाळा सुसहय़ राहण्याची चिन्हे आहेत.
बंगालच्या उपसागरात वादळाची शक्यता?
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्यावर भारतीय हवामान विभाग लक्ष ठेवून आहे, असे डॉ. मोहोपात्रा यांनी सांगितले.
देशभरात पाऊस
पाकिस्तान व लगतच्या भागावर सक्रिय असलेले दोन पश्चिमी प्रक्षोभ, मालदीव ते मध्य महाराष्ट्रादरम्यान असलेली हवेची द्रोणीय स्थिती याच्यामुळे देशभरात बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अवकाळी, विदर्भात गारपीट
महाराष्ट्रात कोकण-गोवा वगळता सर्वत्र अवकाळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, काही भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.








