वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत शनिवारी येथे यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि विद्यमान विजेता गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याला येथील इडन्स गार्डन मैदानावर दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. सध्या राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर असून गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
नितीश राणाच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलग चार सामने गमवावे लागले. त्यानंतर बेंगळूरमध्ये 26 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात कोलकाताने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा पराभव करत पुन्हा आपल्या संघाची गाडी रुळावर आणली आहे. मात्र कोलकाता संघातील विंडीजची जोडी आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांच्याकडून फलंदाजीत अपेक्षा भंग होत आहेत. दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावे लागणाऱ्या नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या गैरहजरीत कोलकाताचा संघ जेसन रॉयचे ट्रम्प कार्ड वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. इंग्लंडच्या रॉयने नितीश राणा, रिंकू सिंग आणि डेविड विसे यांच्या प्रमाणेच वेगवान अर्धशतक झळकवले आहे. बेंगळूरकडून विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघातील या तीन फलंदाजांनी वेगवान फलंदाजी केली. जेसन रॉयने या स्पर्धेत तीन सामन्यात अनुक्रमे 43, 61 आणि 56 धावा जमवल्या आहेत. शनिवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर कोलकाता संघाच्या फलंदाजीची सत्त्वपरीक्षा राहिल. 10 संघाचा सहभाग असलेल्या या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुणतक्त्यात कोलकाताचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. कोलकाता संघाने आतापर्यंत सहा गुण नोंदवले असून त्यांचे या स्पर्धेतील उर्वरित सहा सामने बाकी आहेत. या उर्वरित सामन्यापैकी त्यांनी किमान पाच सामने जिंकले तर त्यांना प्ले ऑफची आशा बाळगता येईल. या उर्वरित सहा सामन्यांपैकी कोलकाताचे दोन सामने बाहेरच्या ठिकाणी होत असून त्यापैकी एक सामना चेन्नईत खेळविला जाणार आहे.
विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने या स्पर्धेत आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली असून या संघाकडे प्रतिस्पर्ध्यावर थरारक विजय मिळवण्याची क्षमता निश्चितच आहे. मात्र लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला हार पत्करावी लागली होती. 2022 च्या जानेवारीमध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिक पांड्याने विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत 31 पैकी 23 सामने जिंकले आहेत.
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यात गुजरात टायटन्सने सातपैकी पाच सामने जिंकत 10 गुणासह दुसरे स्थान मिळवले आहे. राजस्थान रॉयल्स संघाने सरस धाव सरासरीच्या जोरावर 10 गुणासह पहिले स्थान हस्तगत केले आहे. राजस्थान आणि गुजरात या दोन संघामध्ये आघाडीच्या स्थानासाठी चुरस शेवटपर्यंत कायम राहिल असा अंदाज आहे. गुजरात संघाकडे मोहमद शमी, हार्दिक पंड्या, रशीद खान, नूर अहमद हे प्रमुख गोलंदाज आहेत. या संघातील साई सुदर्शनकडून तसेच नवोदित अभिनव मनोहरकडून कामगिरीत सातत्य दिसत आहे. कोलकाताच्या खेळपट्टीवर शमी आणि हार्दिक पंड्या हे प्रभावी ठरू शकतील. कोलकाता संघातील वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, कर्णधार नितीश राणा, जगदीशन यांच्या फलंदाजीची शनिवारच्या सामन्यात गुजरातच्या फिरकी गोलंदाजासमोर सत्त्वपरीक्षा ठरेल. वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा हे बेंगळूरविरुद्धच्या सामन्यात अधिक दर्जेदार कामगिरी करू शकले उमेश यादवकडून मात्र गेल्या आठ सामन्यात चांगली गोलंदाजी होत नसल्याचे दिसून येते.
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, के. एस. भरत, साहा, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, शमी, प्रदीप संगवान, आर. साई किशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, रशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओ. स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नलकांडे, डेव्हिड मिलर, दसून शनाका, जोश लिटल, यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, अल्झारी जोसेफ, मोहित शर्मा. कोलकाता नाईट रायडर्स : ा†नतीश राणा (कर्णधार), रहमानउला गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, ा†टम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड ा†वसे, कुलवंत खेजरा†लया, ा†लटन दास, मनदीप सिंग, जेसन रॉय आणि आर्या देसाई.









