संजदचे माजी प्रवक्ते ः रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर अजय आलोक यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आलोक हे संजदमध्ये दीर्घकाळ प्रवक्तेपदी राहिले आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आलोक यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर स्वतःच्या कुटुंबात आल्याचे वाटत असल्याचे उद्गार आलोक यांनी पक्षप्रवेशानंतर काढले आहेत.
भाजपच्या या परिवाराचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत. मोदींचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मोदी मिशनमध्ये 1 टक्के योगदान देऊ शकलो तरीही माझ्यासाठी ही गोष्ट ठरणार असल्याचे आलोक यांनी म्हटले आहे. अजय आलोक यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढविली होती. संजदने मागील वर्षी आलोक यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
नितीश कुमार यांना अनेक लोक ‘पलटीमार’ म्हणतात, जे अत्यंत योग्य आहे. नितीश कुमार यांनीच 87 वर्षांनी तुरुंग नियमावलीत दुरुस्ती करत शासकीय सेवकाच्या हत्येच्या गुन्हेगाराची कधीच सुटका न करण्याची तरतूद केली होती. परंतु अता आनंद मोहन अन्य कैद्यांच्या मुक्ततेसाठी नितीश यांनीच ही तरतूद हटविली आहे. दलितांची हत्या करणारा गुन्हेगार विशिष्ट जातीचे असल्याने त्यांची मुक्तता करणे योग्य आहे का असा सवाल आलोक यांनी नितीश कुमारांना उद्देशून विचारला आहे.
बिहारमध्ये संजद विरोधात आलोक हे भाजपसाठी मोठे अस्त्र ठरू शकतात. लोकसभा निवडणूक नजीक आल्याने नितीश यांच्या एका निकटवर्तीयाला स्वतःच्या गोटात सामील करण्यास भाजपने यश मिळविले आहे.