वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या पूनामल्लीमध्ये भाजप नेते तसेच पक्षाच्या अनुसूचित जाती शाखेच्या पदाधिकाऱयाची हत्या करण्यात आली आहे. वलारपुरम ग्राम पंचायत अध्यक्ष बीबीजीटी शंकर हे गुरुवारी रात्री एका विवाहसोहळय़ातून परतत असताना ही घटना घडली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन रोखले आणि देशी बॉम्ब फेकले, शंकर यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यावर हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे जात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
द्रमुक सरकारच्या काळात गुन्हय़ांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पोलिसांनी लोकांचे आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करणे अपेक्षित आहे, परंतु राज्यातील पोलीस द्रमुकच्या प्रचार विभागाप्रमाणे काम करत आहेत. गृह मंत्रालय सांभाळणारे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे कायदा-सुव्यवस्था राखण्यास असमर्थ ठरले आहेत. अशा घटना सुरूच राहिल्यास भाजप पूर्ण तामिळनाडूत निदर्शने करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी दिला आहे.
मागील वर्षी तामिळनाडूत भाजप नेते बालचंद्रन यांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी बालाचंद्रन यांच्यावर चाकूने शेकडो वार केले होते. बालाचंद्रन यांना राज्य सरकारकडून सुरक्षारक्षक पुरविण्यात आला होती, सुरक्षा पुरविण्यात आल्यावरही बालाचंदन यांची हत्या झाली होती.