पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन ः 18 राज्यांमधील 2 कोटी लोकापर्यंत विस्तार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशात रेडिओ कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी 100 वॅट कॅपिसिटीच्या 91 एफएम रेडिओ स्टेशन्सचे उद्घाटन केले आहे. 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या 84 जिल्हय़ांमध्ये या एफएम रेडिओ स्टेशन्सचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. रेडिओ अन् एफएमशी माझे नाते एका श्रोत्याचे देखील आहे आणि मी एक होस्ट देखील असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले आहेत.
लडाखच्या न्योमा गावात जगातील सर्वाधिक उंचीवर ट्रान्समीटर लावण्याचा विक्रम करण्यात आला आहे. न्योमा 4100 फुटांच्या उंचीवर असून तेथून अनेक किलोमीटरपर्यंत रेडिओचा लाभ मिळणार आहे. न्योमासोबत लडाखच्या खल्त्से, दिस्कितमध्येही रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
डिजिटल इंडियाने रेडिओला नवे श्रोते अन् नवा विचार दिला आहे. देशात झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीने रेडिओ अन् एफएमला नवा अवतार दिला आहे. इंटरनेटमुळे रेडिओ मागे पडला नसून उलट ऑनलाइन एफएम आणि पॉडकास्टद्वारे नवोन्मेषी पद्धती समोर आल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या 91 एफएम ट्रान्समिशनची ही सुरुवात देशाच्या 85 जिल्हय़ांमधील 2 कोटी लोकांना एक मोठी भेट असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
काही दिवसांनी रेडिओवर मन की बातचा 100 वा एपिसोड करणार आहे. मन की बातचा हा अनुभव देशवासीयांसोबत अशाप्रकारे भावनात्मक बंध केवळ रेडिओमुळे शक्य होता. रेडिओद्वारे देशवासीयांचे सामर्थ्य आणि सामूहिक सेवेशी मी जोडलेला राहिलो. एफएम ट्रान्समिशनमुळे निर्माण होणाऱया कनेक्टिव्हिटीच आणखी एक पैलू आहे. देशाच्या सर्व भाषा आणि विशेषकरून 27 बोलीभाषांचा वापर होणाऱया भागांमध्ये या एफएम ट्रान्समिशनद्वारे प्रसारण होईल. याचा अर्थ कनेक्टिव्हिटी केवळ संवादाच्या साधनाला परस्परांना जोडत नाही, तर लोकांनाही जोडत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
रेडिओ कनेक्टिव्हिटीत भर
ही रेडिओ स्थानके राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अशा भागांमध्ये सुरू करण्यात आली आहेत, जेथून याकरता मागणी करण्यात आली होती. तर सीमेला लागून असलेल्या काही भागांमध्येही कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी हे ट्रान्समीटर्स बसविण्यात आले आहेत. या एफएम ट्रान्समीटर्सद्वारे 2 कोटी लोकांपर्यंत सेवेचा विस्तार होईल. तसेच देशात एफएम कनेक्टिव्हिटीची कक्षा 35 हजार चौरस किलोमीटरने वाढली आहे.
या राज्यांमध्ये रेडिओ स्थानक सुरू
91 एफएम रेडिओ स्थानके बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागलँड, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, लडाखसोबत अंडमान आणि निकोबार बेटसमुहात सुरू झाली आहेत.









