2 लाख मोबाइल नंबर ब्लॉक ः 14 गावांमध्ये छापे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणा पोलिसांनी दिल्लीला लागून असलेला ‘नवा जामताडा’ म्हणजेच मेवातमध्ये सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या मेवातच्या (दिल्लीपासून 80 किलोमीटर अंतरावर) 14 गावांमध्ये छापे टाकले आहेत. यादरम्यान 100 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या 2 लाखाहून अधिक मोबाइल नंबर्सना ब्लॉक करविले आहे. छाप्याची ही कारवाई गुरुग्रामच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून यात 5 हजार पोलिसांनी भाग घेतला होता.

दिल्लीला लागून असलेल्या भागांमधून देशभरात सातत्याने सायबर गुन्हे घडवून आणले जात होत. केंद्र सरकारने अलिकडेच 9 राज्यांमध्ये सायबर क्राइमचे 32 हॉटस्पॉट असल्याचे सांगितले होते, यात मेवात, भिवानी, नूह, पलवल, हसनपूर, हथन गावाचा समावेश होता.
सातत्याने मिळत असलेल्या सायबर फसवणुकीच्या तक्रारींनंतर संबंधित गावांमध्ये कारवाई करण्याकरता गोपनीय स्तरावर रणनीति आखण्यात आली. यानंतर 102 पथकांनी 14 गावांना घेरून छापे टाकले आहेत. मेवातच्या पुन्हाना, पिंगवा, बिछौर, फिरोजपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या अंतर्गत येणाऱया महू, तिरवडा, गोकलपूर, लुहिंगा कला, अमीनाबाद, नई, खेडला, गादौल, जेमन्त, गुलालता, जखोपूर, पापडा, मामलिका या गावांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. यादरम्यान 14 पोलीस उपअधीक्षक, 6 अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून 102 पथके निर्माण करण्यात आली होती. या पथकांमध्ये सुमारे 5 हजार पोलीस कर्मचारी सामील होते.
आतापर्यंत झारखंडच्या जामताडाला सायबर गुन्ह्य़ांचे केंद्र मानले जात होते. परंतु देशातील 9 राज्यांमधील 36 हून गावे आणि शहरे आता सायबर गुन्हय़ांची केंद्रे ठरल्याचे सरकारकडून अलिकडेच सांगण्यात आले होते. हरियाणा, दिल्ली, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात आणि आंध्रप्रदेश ही राज्ये सायबर क्राइमचे हॉटस्पॉट ठरली आहेत.
हॉटस्पॉट कुठे
हरियाणा ः मेवात, भिवानी, नूह, पलवल, मनोटा, हसनपूर, हथन गाव
दिल्ली ः अशोक नगर, उत्तम नगर, शकरपूर, हरकेश नगर, ओखला, आझादपूर
बिहार ः बांका, बेगूसराय, जमुई, नवादा, नालंदा, गया
आसाम ः बारपेटा, धुबरी, गोलपाडा, नागांव
झारखंड ः जामताडा, देवघर
पश्चिम बंगाल ः आसनसोल, दुर्गापूर
गुजरात ः अहमदाबाद, सूरत
उत्तरप्रदेश ः आझगमड
आंध्रप्रदेश ः चित्तूर
झारखंडचे जामताडा
मागील काही वर्षांपासून झारखंडच्या जामताडाला सायबर गुन्हय़ांचे केंद्र मानले जात आहे. जामताडातील अनेक गावांमध्ये शेकडो ठकसेन असून ते सायबर फसवणूक करत असतात. वेगवेगळय़ा प्रकारे लोकांचा विश्वास संपादन करत बँक खात्यातील रक्कम पळविणारे जामताडातील सायबर ठक पूर्ण देशात चर्चेचा विषय राहिले आहेत. यावर एक वेबसीरिज देखील तयार करण्यात आली आहे. सीताराम मंडलला जामताडाचा मास्टरमाइंड मानले जाते. मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करून 2012 मध्ये जामताडा येथे परतलेल्या सीतारामने सायबर फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्याने स्वतःच्या या गुन्हय़ात शेकडो लोकांना सामील करत देशभरातील लोकांना कोटय़वधींचा गंडा घातला होता.









