ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तुमसर-मोहाडी विधानसभेचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. केसीआर यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.
पक्षप्रवेशानंतर वाघमारे म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे केसीआर यांच्या पक्षाचे मूळ उद्दिष्ट आहे. केसीआर यांनी तेलंगणात पेलेल्या विकासाची पाळेमुळे महाराष्ट्रातही रुजली पाहिजेत, असे मला वाटते. त्यांनी तेलंगणात शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने योजना राबवल्या हे नांदेडच्या सभेतून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचले. तेलंगणा सरकार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशा योजना सातत्याने राबवीत आहे. त्यामुळे तेथील शेतकरी सुखी आहे.
गोरगरिब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पक्षात जाण्यास काहीच हरकत नाही, असे मला वाटते. त्यामुळे मी कार्यकर्त्यांसह या पक्षात प्रवेश केला, असे वाघमारे यांनी सांगितले.









