काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : मारिहाळ भागात झंजावाती प्रचार
वार्ताहर / किणये
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कुटुंबीयांचा सदस्य आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या प्रत्येकाची काळजी घेणे हे माझे कर्तव्य समजते. मला ग्रामीण मतदारसंघाच्या प्रत्येक गावातून तुम्ही सर्वांनी आपली लेक म्हणून मागच्या वेळेस निवडून दिले. यावेळीही तुम्ही मला निवडून द्याल अशी खात्री आहे, असे मनोगत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मारिहाळ येथे व्यक्त केले. बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रचारफेरी गुरुवारी सायंकाळी मारिहाळ भागात काढण्यात आली. या फेरीत महिला व त्यांच्या समर्थकांची अलोट गर्दी दिसून आली. हेब्बाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांनी यावेळी केला. ग्रामीण मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. सर्व भागातून मला भरभरून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मी अगदीच भारावून गेली आहे. यापुढे ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
मारिहाळ गावात त्यांचे पुष्पवृष्टी करून व मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. प्रचार वाहनात लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व काँग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी होती. यावेळी ठिकठिकाणी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे महिला स्वागत करीत होत्या. तसेच त्यांना प्रचंड पाठिंबा वाढला असून पुन्हा एकदा हेब्बाळकर यांना निवडून आणणार, असा ठाम निर्धार भागातील कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी केला आहे.









