मुस्लीम मते खेचन्यासाटी काँग्रेस -निजदमधे चडाओड
राज्यात मुस्लीम मतांचे प्रमाण 13 टक्के
राज्यातील भाजप सरकारने चार टक्के आरक्षण रद्द केल्याने नाराज झालेल्या मुस्लीम समाजाची मते खेचण्यासाठी काँग्रेस आणि निजदमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. भाजपने आपल्या पवित्र्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय स्पष्ट केला असून मुस्लीम मतावर जवळजवळ पाणीच सोडले आहे. तर याचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि निजद करत आहे.
काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देऊन मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. गेल्या 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने मुस्लीम समाजातील 17 जणांना उमेदवारी दिली होती. यावेळी ही संख्या 14 असली तरी याचे मोठे भांडवल हा पक्ष करीत आहे. तर निजदने याच्याही पुढे जाऊन यावेळच्या निवडणुकीत तब्बल 22 जणांना उमेदवारी दिली आहे. गेल्या 2018 च्या निवडणुकीत हे प्रमाण केवळ 12 होते. मुस्लीम समाजातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आम आदमी पक्ष आघाडीवर असून या पक्षाने तब्बल 25 जणांना उमेदवारी दिली आहे.
निजद मात्र आपल्यावरील भाजपची बी टीम असल्याचा शिक्का पुसून टाकण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने निजदवर भाजपची बी टीम असल्याचा जोरदार प्रचार केला होता. त्याचा फटका निजदला बसत कमी मुस्लीम मते मिळाली होती. यावेळी निजदने अधिक संख्येने मुस्लिमांना उमेदवारी देऊन या समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसपेक्षा निजद हा मुस्लीम समाजाचे हित जपतो हे दाखवून देण्यासाठी या पक्षाने सी. एम. इब्राहिम यांना प्रदेशाध्यक्षपदी बसविले आहे.
57 ठिकाणी मुस्लिमांची मते निर्णायक
मुस्लीम समाजाचे नेते मात्र आपल्या समाजाकडे केवळ व्होट बँक म्हणून पाहिले जाते याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लीम समाजाला खूपच कमी राजकीय प्रतिनिधित्व मिळत आहे. मुस्लीम समाजाची मते ज्या ठिकाणी निर्णायक आहेत, तिथे या समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी आपली मागणी आहे. राज्यात तब्बल 57 ठिकाणी मुस्लिमांची मते निर्णायक आहेत. त्यामुळे या समाजाला योग्य ते राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, असे अखिल कर्नाटक सुन्नी उलेमा बोर्डचे सरचिटणीस मुफ्ती शरीफ उर रहमान हे सांगतात.
काँग्रेसकडून तीन ख्रिश्चन व्यक्तींना उमेदवारी
काँग्रेसने तीन ख्रिश्चन व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तर आपने चार ख्रिश्चनांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र मुस्लीम समाजातील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आम्ही मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी पहात नसून उमेदवारांची विनाबिलिटी म्हणजेच जिंकून येण्याची क्षमता पाहतो, असे त्यांनी म्हटले आहे.
व्होट बँकेवर डोळा…
कर्नाटकात मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल 13 टक्के आहे. या व्होट बँकेवर डोळा ठेवून भाजप वगळता या तिन्ही पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारी जाहीर केली आहे. जरी यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसने मुस्लीम समाजाला कमी प्रतिनिधीत्व दिले असले तरी जेथे-जेथे या समाजाने विनंती केली आहे, तेथे उमेदवारी देऊन टाकली आहे. याला अपवाद फक्त दावणगिरीचा आहे. या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना निवडून येण्याची शक्मयता जास्त असल्यामुळे काँग्रेसने केवळ त्या ठिकाणी मुस्लीम समाजाची विनंती मान्य केलेली नाही. तर पुलकेशीनगर येथे काँग्रेसने अखंड श्रीनिवासमूर्ती या विद्यमान आमदार आणि दिग्गजाला डावलून मुस्लीम समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजाने तिकिटासाठी जोरदार आग्रह धरला होता.
निवडणूक कोण घेतेय? आयोग की भाजप?
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेंच्या पत्रावरून वादंग
राज्यात निवडणूक प्रचारात आघाडी घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जुगलबंदी सुरू आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री आणि राज्य भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संचालक शोभा करंदलाजे यांनी सर्व जिल्हा भाजपाध्यक्ष, जिल्हा मुख्य सचिव, उमेदवार आणि निवडणूक एजंटांना पाठविलेले पत्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात निवडणूक आयोग घेत आहे की भाजप?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शोभा करंदलाजे यांनी भाजप जिल्हाध्यक्षांसह इतरांना पाठविलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्यांनी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती सादर करण्याची सूचना दिली आहे. शिवाय कोणकोणत्या मतदान केंद्रांत संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्याची गरज आहे?, कोणत्या भागात केंद्रीय सुरक्षा दल किंवा निम लष्करी दलाची तकडी तैनात करावी लागेल, कोणत्या मतदान केंद्रात वेब कास्टींग आणि व्हिडिओ रेकॉर्डींगची गरज आहे, याविषयी माहिती ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.
या पत्रावरून सिद्धरामय्या यांनी ट्विटरवरून भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भाजपला मतदान करणाऱ्या केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित करणार की काँग्रेसला मतदान होणाऱ्या मतदान केंद्रांना?, काँग्रेसच्या बाजूने मतदार असणाऱ्या मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या नावाखाली केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करून मतदानांना धमकावण्याचा उद्देश असावा. मतदान केंद्रांमध्ये वेब कास्टींग आणि व्हिडिओ रेकॉर्डींग करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नव्हे का?, हे करण्यास राजकीय पक्षाला परवानगी कोणी दिली?, असा प्रश्नही सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी पत्र पाठविल्याचे पाहिले तर केंद्रातील भाजप सरकारवर गैरव्यवहारामध्ये गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून शोभा करंदलाजे यांची चौकशी करावी. त्यांना कोणत्याही प्रचारामध्ये सहभागी होण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली आहे.
11 दिवसात 42 ठिकाणी देवेगौडांचा प्रचार
माजी पंतप्रधान, निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी वयाच्या 89 व्या वर्षीही निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. शुक्रवारपासून पुढील 11 दिवस 42 ठिकाणी आपल्या पक्षातर्फे प्रचार करून मतयाचना करणार आहेत. आपली प्रकृती लक्षात घेऊन आठवड्यातून एकदा विश्र्रांती घेतो, असे देवेगौडा यांनी सांगितले आहेत. शुक्रवारपासून 8 मे या कालावधीत 42 ठिकाणी प्रचार करणार आहे. 18 मे रोजी देवगौडा 90 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. पक्षाने 211 उमेदवार उभे केले असून त्यापैकी दोघांनी उमेदवारी मागे घेतली असून दोन अर्ज अवैध ठरले आहेत. निजदचे 207 उमेदवार रिंगणात आहेत.
सिद्धरामय्यांची सून पहिल्यांदाच प्रचाराच्या रिंगणात
वऊणा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री व्ही. सोमण्णा यांचा निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. सिद्धरामय्या यांची सून स्मिता राकेश यांनी पहिल्यांदाच सासऱ्यांसाठी प्रचार सुरू केला असून वऊणा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन मतयाचना केली आहे. आतापर्यंत सिद्धरामय्यांच्या कुटुंबात पुरुष वगळता अन्य कोणीही प्रचाराच्या रिंगणात उतरलेले नव्हते. राकेश सिद्धरामय्या यांच्या पत्नी स्मिता राकेश या पहिल्यांदाच मतदारसंघातील तायूर ग्रा.पं. अंतर्गत गावोगावी जाऊन काँग्रेसला मतदान करण्यास सांगत आहेत.
अमेरिकेतील नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
यावेळच्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दो•बळ्ळापूर मतदारसंघात गेल्या साठ वर्षांत सर्वाधिक कमी वयाचा उमेदवार यावेळी राष्ट्रीय पक्ष भाजपकडून रिंगणात आहे. अनेकदा चाचपणी करून भाजपने येथे 31 वर्षाच्या अमिरेकेतील विद्यापीठात एमएस केलेल्या धीरज मुनीराज यांना उमेदवारी दिली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवाराला येथे संधी मिळाली आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या व उद्योग क्षेत्रात आपले नाव केलेल्या पी. मुनीराज यांचा मुलगा धीरज यांना पक्षाने हेरले आहे. अमेरिकेत मास्टर्स पदवी घेऊनही ते भारतात स्थायिक होऊन येथे सामाजिक कार्यात सहभागी आहेत. बेंगळूरचे मूळचे असलेल्या आर. व्ही. कॉलेजमध्ये बी.ई. पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. टेक्सासमध्ये एमएस पदवी घेतल्यानंतर अमिरेकेतच नोकरी करण्याची संधी असतानाही त्यांनी मायदेशी परतले. काही दिवस विविध कंपन्यांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. कमी वयातच तुमकूर विद्यापीठाचे कौन्सिल सदस्य, भाजपचे जिल्हा संचालक म्हणूनही काम केले आहे. कोरोनाकाळात अंजनांद्री ट्रस्टच्यावतीने सामाजिक कार्य केले आहे. पंतप्रधानांचे राष्ट्र निर्माण मिशन पाहून व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देश प्रथम या परिकल्पनेतून ते भाजपशी जोडले गेले. 3 वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क वाढविलेले धीरज यांनी कामगार, शेतकरी यांच्यासाठी कार्य केले आहे. माझे लोकांसाठी असलेले काम पाहून भाजपने मला संधी दिली आहे. यापुढेही अधिक कामासाठी लोकांकडे मते मागितली आहेत, असे धीरज यांनी सांगितले.
राजकीय पक्षांचे डावपेच;एकाच नावाचे अनेक उमेदवार
के. एच. पुट्टस्वामीगौड, के. पुट्टस्वामीगौड, पुट्टस्वामी, एम. कृष्णरे•ाr, कृष्णरे•ाr, के. सुधाकर, एन. सुधाकर, डॉ. एम. सी. सुधाकर, डॉ. के. सुधाकर, एन. सुधाकर ही यंदाच्या निवडणुकीत विविध मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या एकाच नावाचे उमेदवार आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात याबाबत चर्चा रंगली आहे. उमेदवारी प्रक्रिया सुरू होताच विजयासाठी अनेक डावपेच आखलेल्या राजकीय पक्षांनी प्रतिस्पर्धी पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करण्याच्या दिशेने राजकीय रणनीती आखली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये विरोधकांशी साधर्म्य नावे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. मतांचे विभाजन करण्यासाठी राजकीय पक्ष प्रत्येक वेळी निवडणुकीत या डावपेचांचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची टक्केवारी कमी करतात. विशेषत: चिक्कबळ्ळपूर मतदारसंघात डॉ. के. सुधाकर यांच्या नावाप्रमाणेच एन. सुधाकर, चिंतामणी येथे डॉ. एम. सी. के. सुधाकर यांच्या नावाप्रमाणे सुधाकर आणि एम. कृष्णरे•ाr यांच्या नावाप्रमाणे कृष्णरे•ाr यांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून रिंगणात उतरले आहेत.
गौरीबिदनूर येथे एकाचे नावाचे चार उमेदवार
गौरीबिदानूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी अपक्षांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असून के. एच. पुट्टस्वामी गौडांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी तीन पुट्टस्वामी गौडांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
प्रक्षोभक वक्तव्याबद्दल अमित शहांविरुद्ध तक्रार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांविरुद्ध काँग्रेसने बेंगळूरच्या हायग्राऊंड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अमित शहा यांनी प्रक्षोभक भाषण केले आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, कर्नाटक शांतता असणारे राज्य आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास जातीय दंगली होतील, काँग्रेसला मते देऊ नका, असे मतदारांना धमकावले आहे, असा आरोप काँग्रेसने अमित शहा यांच्यावर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी. पे-सीएमम पोस्टर लावल्यानंतर आयोगाने आमच्यावर कारवाई केली. मात्र, अमित शहा यांच्यावर कारवाई केली नाही, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे.
दक्षिण कर्नाटकात लिंगायत उमेदवारांना प्राधान्य नाहीच
11 जिल्ह्यांमधील 89 मतदारसंघांचे चित्र
भाजप, काँग्रेस आणि निजद या तिन्ही पक्षांनी लिंगायत समाजाला आपल्याकडे खेचून आणण्याची रणनीती आखली असून त्यात कोण यशस्वी होतं ते 13 मेच्या निकालाच्या दिवशी कळणार आहे. पण तसं पाहिले गेल्यास तिन्ही पक्षांनी लिंगायत समाजातील उमेदवार अपेक्षेएवढे मतदारसंघात उभे न केल्याने नाराजी व्यक्त होताना दिसते आहे. 11 जिल्ह्यापैकी 7 मध्ये लिंगायत समाजाच्या उमेदवाराला पक्षांकडून उभे करण्यात आलेले नाही, असे दिसून आले आहे. अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासभेकडून प्रत्येक पक्षाने 28 जागांवर किमान 5 लिंगायत समाजातील उमेदवारांना संधी देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. राजाजीनगर, गोविंदराजनगर, विजयनगर, महालक्ष्मी लेआऊट अशा भागांमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या अधिक असल्याचा दाखला महासभेकडून देण्यात आला आहे. व्ही. सोमण्णा हे एकमेव लिंगायत समाजाचे गोविंदराज नगर मधून आमदार होते पण त्यांना आता वरुणामधून उभे करण्यात आले आहे. आपल्या मुलाला सदरच्या मतदारसंघात तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला खरा पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. बेंगळूर शहरात एकही लिंगायत समाजाचा उमेदवार उभा राहिलेला नाही. बेंगळूर ग्रामीण, कोलार, मंड्या, रामनगर, चिक्कबळळापूर तसेच कोडगू येथेही उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. हासन, चामराजनगर, म्हैसूर व तुमकूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 11 जिल्ह्यांपैकी 89 मतदारसंघांचा आढावा घेतला असता फक्त 14 लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. यावरून एकंदरच उमेदवार उभे न करण्याबाबत समाजात नाराजी दिसून येते आहे.
आता मतदान केंद्रांची होणार आकर्षक सजावट
विधानसभेची धामधूम जोरात असून अवघ्या काही दिवसांवर आता निवडणूक तारीख राहिली आहे. मतदानाच्या तयारीत राज्य प्रशासनासह शिक्षकही हातभार लावत आहेत. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शाळांच्या भिंती (मतदान केंद्रे) आकर्षक सजावट करत आहेत. लोकसंस्कृतीचे दर्शन या थीम बेस पोलिंग स्टेशन्समध्ये पाहायला मिळणार आहे. निवडणूक अधिकारी मतदान केंद्रांच्या तयारी विषयीची माहिती घेण्यामध्ये सध्या दंग झाले आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची जमवाजमवी करणे यासह इतर कामांमध्ये अधिकारी व त्यांचे सहकारी व्यस्त झाले आहेत. निवडणुकीमध्ये काही मतदान केंद्रे ही आकर्षक पद्धतीने सजवण्याची योजना बनविली जात आहे. ऐतिहासिक इमारत, पारंपारिक कला यांचा वापर करून मतदान केंद्रे आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारी शाळेतील शिक्षकांनी राज्यभरातील 2500 मतदान केंद्रांची वरील पद्धतीने आकर्षक सजावट केली असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. शाळेच्या खोल्या या निवडणुकीकरिता मतदान केंद्रे म्हणून वापरल्या जातात, ज्यांची सजावट अनोख्या पद्धतीने करण्यात येत आहे. या आकर्षक मतदान केंदात कला गॅलरीचीही सोय केली असून मतदारांना याचा लाभ घेता येणार आहे. स्थानिक कला संस्कृती सादरीकरणाचा प्रयत्नही या सजावटीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे समजते. अशा पद्धतीने राज्यामध्ये जवळपास 2,500 थीमवर आधारित केंद्रे तयार केली आहेत. म्हैसूरसह चामराज नगर, मंगळूर, कोडगू, उडुपी यासह सहा जिल्ह्यांमध्ये जवळपास 40 मतदान केंद्रे आकर्षक पद्धतीने तयार होत असून विविध जाती समुदायाच्या कलासंस्कृती जीवनाविषयीचे दर्शन सजावटीच्या माध्यमातून मतदारांना केंद्रावर घेता येणार आहे. काही शिक्षिका गेल्या महिन्याभरापासून ज्या कला शिक्षिका आहेत यांच्याकडून शाळा खोल्यांची रंगरंगोटी पर्यावरणीय व इतर आकर्षक रचनांच्या माध्यमातून साकारली जात आहे. किनारी जिल्ह्यांमध्येसुद्धा अशा प्रकारची मतदान केंद्रे वेगळ्या पद्धतीने सजविली जात आहेत. ज्यामध्ये यक्षगान व कम्बाला यासारख्या व तेथील लोकसंस्कृती जपणाऱ्या विविध कला पाहायला मिळणार आहेत. म्हैसूर जिल्ह्यांमधील मतदान केंद्रांवर म्हैसूर पॅलेसचा अनुभवही मतदारांना घेता येणार आहे. बागलकोटमध्ये केंद्रांवर इळकल साडी संदर्भातील कला प्रदर्शित केली जाणार आहे. 1120 मतदान केंद्रांची व्यवस्था संपूर्णपणे महिलांकडेच असणार असल्याची माहिती आहे. चित्रदुर्गमध्ये तेथील स्थानिक किल्ल्याचे चित्र, ओणके ओब्बव्वा यांची पेंटिंग्जही शाळांच्या भिंतीवर मतदारांना पाहता येणार आहेत. हे सगळं चाललं आहे ते यंदाच्या निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी. आकर्षक मतदान केंद्राच्या निमित्ताने मतदार येतील आणि आपल्या बहुमुल्य मताचा वापर करतील, अशी आशा राज्य सरकारला आहे.
शेट्टरांचा विजय शंभर टक्के निश्चित; कार्यकर्त्याने रक्ताने लिहले पत्र
प्रचाराच्या आखाड्यात राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामध्येच आता राज्य राजकारण रक्ताचे राजकारण सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केलेल्या रक्ताच्या मुद्द्यावरील वक्तव्यामुळे आता काँग्रेस, निजद आणि भाजपचे अन्य नेते रक्ताबाबत भाष्य करीत आहेत. दरम्यान, एका युवा कार्यकर्त्याने भाजपचे ज्येष्ठ नेते येडियुराप्पा यांना रक्ताने पत्र लिहले आहे. रक्ताने लिहून देतो, यंदाच्या निवडणुकीत जगदीश शेट्टर विजयी होणार नाहीत, असे येडियुराप्पा यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर लिंगायत युवा नेता मंजुनाथ यंट्रुवी याने रक्ताने पत्र लिहून येडियुराप्पांनाच टोला लगावला आहे. हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघात जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित असल्याचे पत्र त्याने रक्ताने लिहिले झाले आहे. पत्रामध्ये जगदीश शेट्टर यांचा 100 टक्के विजय निश्चित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर यंदा राज्यात काँग्रेसच सत्तेवर येणार आहे. ‘जय काँग्रेस’ असा उल्लेखही मंजुनाथ याने केला आहे.
बंगाराप्पांचे पुत्र पाचव्यांदा सोरबच्या रिंगणात
शिमोगा जिल्ह्यातील सोरब विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दोन भावांमध्ये रंगणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांची दोन मुले कुमार बंगारप्पा व मधू बंगारप्पा हे एकमेकांशी पाचव्यांदा लढणार आहेत. 2004 पासून विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून दोघेही भाऊ एकमेकांविरुद्ध सोरबच्या निवडणूक रणांगणावर लढत आहेत. या खेपेला दोघांमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे मतदारांना वाटते आहे. कुमार हे काँग्रेसच्या तिकिटावर 2004 मध्ये तर मधू हे 2008 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होते. 2013 मध्ये मधू निजदच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसतर्फे कुमार विरोधात होते. भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर कुमार यांनी निजदचे उमेदवार मधू यांना 2018 च्या निवडणुकीमध्ये पराभवाची धूळ चारली होती. मधू यांनी 2023 च्या निवडणुकीत भाजप सरकारच्या अपयशाचा मुद्दा जनतेसमोर मांडला असून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा मुद्दाही ते उचलून धरत आहेत. कुमार मात्र विकास कामांच्या माध्यमातून जनतेसमोर मते मागत आहेत. कुमार हे भाजपतर्फे तर मधू काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत.
मंगळूरमधील डॉक्टर वरुणामधून रिंगणात
पेशाने डॉक्टर आणि पत्रकार म्हणून कार्यरत असणारे यु. पी. शिवानंद हे विधानसभा निवडणुकीसाठी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात श•t ठोकणार आहेत. या डॉक्टरने यापूर्वी राहुल गांधींविरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्याचप्रमाणे शिग्गावमधूनही ते विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. मंगळूरमधील पुत्तूरमध्ये शिवानंद हे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे एका स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून सेवा बजावतात. अलीकडेच ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय झाले असून त्यांनी आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. 2019 मध्ये शिवानंद यांनी अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढविली होती.
बदलासाठी मत द्या, डी. के. शिवकुमार यांचे आवाहन
जातीय ध्रुवीकरणाच्या भावनांपासून दूर रहा आणि बदलासाठी काँग्रेसला मत द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा मतदारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले आहे. देश उभारणीसाठी तसेच बदलासाठी म्हणून काँग्रेसला मतदान करा व खोट्या आश्वासनांना भुलून जाऊ नका, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी करत सध्याचे सरकार हे भ्रष्टाचारामध्ये पुढे असून याने कर्नाटकाची छबी बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, असेही आवाहन त्यांनी केले.
मोदींच्या रॅलीचा परिणाम नाही : एच. डी. देवेगौडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रोड शो आयोजित करणार आहेत. परंतु या अशा प्रकारच्या रॅलींचा विधानसभेच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे विधान माजी पंतप्रधान निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे. मोदींच्या रॅली राज्यामध्ये होणार असल्या तरी त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येणार नाही. आपण 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करणार आहे. गेल्या 60 वर्षांपासून राजकारणामध्ये संघर्ष करत असून हाच विडा कुमारस्वामी यांनी हाती घेतला आहे. पुढील काही दिवस आपण जनतेसमोर जाऊन विविध मुद्दे मांडणार आहे. कृषी कर्जमाफी, वयोवृद्धांना पेन्शन आणि इतर लाभदायक योजना निजदने आपल्या सत्ताकाळामध्ये राबविल्या होत्या. त्याबाबतही आपण जनतेशी सल्लामसलत करणार आहे, असेही ते म्हणाले.
डिजिटल पेमेंटची निवडणूक आयोगाला डोकेदुखी
धानसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस सह भाजप व निजदचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात गुंतले असून मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिह्यांमध्ये रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. या दरम्यान राजकीय पक्षांनी आता मतदारांना लाच देण्यासाठी जी-पे, फोन-पे सारख्या माध्यमांचा वापर वाढवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची आजच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होताना दिसत असली तरी निवडणूक आयोग मात्र सध्या या आधुनिक डिजिटल देवाणघेवाण प्रणालीबाबत चिंतेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवी आव्हाने मात्र निवडणूक आयोगाला झेलावी लागताना दिसत आहेत. निवडणुकीच्या बाबतीतही आयोगाला डिजिटल पेमेंट माध्यमाची डोकेदुखी सतावत आहे. अनेक राजकीय पक्ष जी-पे आणि फोन-पे सारख्या डिजिटल देवाणघेवाणीच्या प्लॅटफॉर्मवरून मतदारांना पैसे पाठवत असल्याची माहिती मिळत आहे. भारतामध्ये 2017-18 मध्ये 2071 कोटी इतके डिजिटल देवाणघेवाणीचे व्यवहार झाले होते. तुलनेमध्ये 2021-22 मध्ये व्यवहार 8 हजार 840 कोटी इतक्या विक्रमी संख्येवर पोहोचले आहेत. ग्रामीण भागातील लोकही आता डिजिटल अॅप्सचा वापर पैशाच्या देवाणघेवाणीकरिता करत असल्याचे दिसून येत आहे. इतर व्यवहारांसाठी लोकांना या डिजिटल पेमेंट प्रणालीचा उत्तम लाभ होत असला तरी सध्याला निवडणूक आयोगाला या माध्यमाची डोकेदुखी होताना दिसते आहे. कारण बऱ्याच राजकीय पक्षांनी या डिजिटल माध्यमातून मतदारांपर्यंत पैसे पोहोचवण्याचे काम केल्याची शंका व्यक्त होत आहे. 10 ते 15 टक्के इतक्या मोफत वस्तू व रक्कम मतदारांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचवल्या गेल्या असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. गुगल पे, फोन पे, भीम अॅप यासारख्या माध्यमांचा वापर केला जात सांगितले जाते. अशा प्रकारचे व्यवहार वाढल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी तातडीने अशा व्यवहारांवर बारीक नजर ठेवण्यास संबंधितांना सांगितले असल्याचे समजते.
व्यवहार रोखण्याची तयारी
प्रत्येक जिह्यामध्ये एक निरीक्षक नियुक्त करण्यात आला असून त्यांच्यामार्फत बँकांकडून माहिती मागवली जात असल्याचे समजते. कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याबाबत जातीने चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यासोबत निवडणूक आयोगाने नुकतीच बैठकही घेतली होती.
मुस्लीम कुटुंबाने उमेदवाराला दिल्या हिंदू पद्धतीने शुभेच्छा
बेंगळूर : के. आर. पी. पी. च्या उमेदवार जी. लक्ष्मीअरुणा या बळ्ळारी शहर विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्या असता मुस्लीम कुटुंबाने त्यांचे स्वागत करत हिंदू पद्धतीने शुभेच्छा दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. खाण उद्योग पट्ट्यामध्ये येणाऱ्या बरोनगल्ली येथे माजी मंत्री जनार्दन रे•ाRच्या पत्नी लक्ष्मी अरुणा प्रचारासाठी मतदारसंघामध्ये दाखल झाल्या होत्या. मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना महिलांचे जास्तीत जास्त त्या समर्थन मिळवित होत्या. रेणुकानगर येथे आल्या असता हर्षीया बानू व दादा पीर यांनी हिंदू पारंपरिक पद्धतीने साडी व इतर वस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. या स्वागताने लक्ष्मी अरुणा भारावून गेल्या होत्या. लक्ष्मी अरुणा या पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
जनता राज्य चालवेल त्याकरिता मोदींची गरजच काय?
चिक्कमंगळूर : राज्यातील जनतेने भाजपला मत द्यावे आणि राज्याचा कारभार सोपवावा, अशा प्रकारचे आवाहन नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावर परखड प्रतिक्रिया देताना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव प्रियांका गांधी यांनी जनता राज्याचा कारभार पाहिल, त्याकरिता मोदींची गरज नाही, असे म्हटले आहे. श्रुंगेरी येथे आयोजित सभेत त्या जतनेला संबोधित करत होत्या. राज्यातील जनतेने का म्हणून आपले भविष्य मोदींच्या हाती द्यावे? बसवेश्वर, कुवेंपू आणि नारायण गुरु यांच्या मुला-मुलींनाही राज्य सांभाळता येतेच की, असे म्हणत प्रियांका यांनी नंदिनी दुधाचा मुद्दा उकरुन काढला. नंदिनी हे कर्नाटकातच बनविले जात असून त्याचे केएमएफकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.
मतदानकेंद्र अधिकाऱ्यांना यंदाही मानधन वाढ नाही
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात येणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या मानधनात यावेळीही कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून हेच मानधन देण्यात येत आहे. मतदानकेंद्र अधिकारी (पीआरओ) यांना प्रतिदिन 500 ऊपये प्रमाणे चार दिवसांचा भत्ता मिळणार आहे. तर एपीआरओ यांना प्रतिदिन 350 प्रमाणे चार दिवसांचा भत्ता मिळणार आहे. यामध्ये मतदान प्रशिक्षणाचे दोन दिवस आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे दोन दिवस यांचा समावेश आहे. मतदान केंद्रात असणाऱ्या पोलिंग ऑफिसरना प्रतिदिन 350 प्रमाणे तीन दिवसांचे मानधन मिळणार आहे. यामध्ये प्रशिक्षणाचा एक दिवस आणि प्रत्यक्ष मतदानाचे दोन दिवस याचा समावेश आहे. तर मायक्रो ऑब्झर्वरना सरसकट ऊपये 1500, बीएलओंना केवळ मतदानादिवशीचे ऊ. 350 आणि डी ग्रुप कर्मचाऱ्यांना 200 ऊ. भत्ता मिळणार आहे.
मतदानासाठी नेमणाऱ्या विविध अधिकाऱ्यांचे मानधन…
- पीआरओ 2000 ऊ.
- एपीआरओ 1400 ऊ.
- पोलिंग ऑफिसर 1050 ऊ.
- मायक्रो ऑब्झर्व्हर 1500 ऊ.
- बीएलओ 350 ऊ.
- डी ग्रुप कर्मचारी 200 ऊ.
प्रचार, निवडणुकीसाठी बसेस बुकींग मात्र, प्रवाशांची गैरसोय
निवडणूक प्रचारसभा, रोड-शोमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढवून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. खासगी वाहनांप्रमाणेच राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून कार्यकर्त्यांनी प्रचारसभांसाठी आणले जात आहे. याकरिता राज्यभरात 10 हजारहून अधिक बसेस बुकींग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 5 मे ते 13 मे पर्यंत बसेसची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. निवडणूक आयोगानेही मतदान व मतमोजणीच्या दिवशी बसेस बुकींग केल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुटीत परवागी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. स्क्रिनिंग आणि स्क्वॉडना देण्याकरिता आरटीओनेही वाहने सज्ज ठेवली आहेत. पोलिंग बूथमध्ये मतदान यंत्रे नेणे तसेच ती स्ट्राँग रुमपर्यंत नेण्यासाठी वाहनांची आवश्यकता आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाल्यास परिवहन मंडळ कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरी समस्यांऐवजी जातीचाच मुद्दा रंगणार
विजापूर मतदारसंघातील चित्र
ऐतिहासिक शहर म्हणून गणना असणाऱ्या विजापूर मतदारसंघाची निवडणूक यंदा नागरी समस्यांऐवजी जातीय आधारावर लढली जाणार आहे. भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्यांमुळे यावेळची निवडणूक रंगणार असल्याचे चिन्ह आहे.
पूर्वी आदिलशाहीची राजवट असणाऱ्या या शहरात कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पाच नद्या या जिल्ह्यामध्ये आहेत. काही विकासाची कामेही स्वातंत्र्यानंतर करण्यात आली आहेत. विविध समस्यांबाबत लोकांमध्ये दरवर्षी चर्चा होते आणि प्रशासनात निवडून आलेल्या उमेदवारांच्या एकंदर कार्यवाहीबाबत नाराजीचाही सूर आहे. तरीही यावेळीची निवडणूक नागरी समस्यांऐवजी जातीच्या आधारावरच होणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार बसवनगौडा पाटील-यत्नाळ यांनी हिंदुत्त्वाचे कार्ड वापरले आहे. विकासाच्या मुद्द्यांना त्यांनी बगल दिली आहे. या मतदारसंघामध्ये 2.77 लाख मतदार असून 1 लाख 5 हजार मुस्लीम मतदार आहेत.
गेल्या चार वर्षांपासून येथील मतदारांना खराब रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा इस्पितळाची येथे सोय असली तरी सरकारी वैद्यकीय कॉलेजची मागणी दुर्लक्षित राहिली आहे. पर्यटक येथे येत असले तरी त्यांच्यासाठी सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. बसवनगौडा पाटील-यत्नाळ यांनी गाणीग समाजाबद्दल मध्यंतरी केलेले वक्तव्य त्यांच्यासाठी निवडणुकीत अडचणीत आणणारे असू शकते, असे म्हटले जात आहे. या समाजाची नाराजी त्यांच्यावर दिसून आली आहे. काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार अब्दुल हमीद मुश्रीrफ निवडणूक रिंगणात असून लिंगायत मतदारांमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
भाजप विरुद्ध काँग्रेस नव्हे ,भाजप विरुद्ध शेट्टर
हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघात चुरशीची लढत
हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघाने यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कोण जिंकणार?, हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. शेट्टर भाजपच्या तिकिटावर रिंगणात असते तर तितके कुतूहल निर्माण झाले नसते. मात्र, यावेळी चित्र वेगळे आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरस म्हणण्याऐवजी जगदीश शेट्टर विरुद्ध भाजप लढत आहे. निवडणुकीसाठी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसने जगदीश शेट्टर, भाजपने महेश टेंगीनकाई आणि निजदने सिद्धलिंगेश्वर गौडा महांत वडेयर यांना रिंगणात उतरविले आहे. यावेळी येथे भाजप आणि काँग्रेसमध्येच झुंज असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. पण या ठिकाणी काँग्रेस नाममात्र. खरी लढत शेट्टर आणि भाजप यांच्यातच असल्याचे स्पष्ट आहे. 1994 पासून 2018 मध्ये सलग 6 निवडणुकांमध्ये जगदीश शेट्टर यांनी हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघात एकतर्फी विजय मिळविला आहे. आता होणारी ही त्यांची सातवी लढत. आता शेट्टर हे भाजपचे उमेदवार नाहीत. पक्षाचे तिकीट न मिळाल्याने ते भाजपमधून बाहेर पडत थेट काँग्रेसच्या गोटात शिरले. 1999 पासून शेट्टर यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराविरुद्ध सरासरी 23 हजारांचे मताधिक्य मिळवत विजयाला गवसणी घातली होती. त्यावेळी भाजप फॅक्टरचा की शेट्टर यांचा वैयक्तिक प्रभाव कारणीभूत ठरला? हे यावेळच्या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
दोन गट ठरविणार निकालाची दिशा
सध्या या मतदारसंघात दोन मतप्रवाह आहेत. भाजपच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारे, भाजपने सर्व प्रकारच्या संधी देऊन सुद्धा तिकीट न मिळाल्याचा मुद्दा समोर ठेऊन पक्षश्रेष्ठींचा शब्द धुडकावलेल्या शेट्टरांना विरोध करणारा गट आहे. तर दुसरा गट शेट्टर समर्थक म्हणजेच व्यक्तीनिष्ठ. शेट्टर कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारा हा गट. पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारून अन्याय केला आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आस्था दाखविणारा दुसरा गट. हे दोन्ही गट या निवडणुकीत निकालाची दिशा ठरविणार आहेत. मतदारसंघात मतदारांची संख्या 2.46 लाखहून अधिक आहे. त्यात लिंगायत मतदारांचा आकडा 70 हजारापेक्षा अधिक आहे.
शेट्टर यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची सूचना भाजपश्रेष्ठींनी दिली आहे. त्यासाठी हुबळीत भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एस. संतोष, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी व्यूहरचना तयार केली आहे. भाजपची पारंपरिक मते भाजप उमेदवारालाच मिळाली पाहिजे, यासाठी बूथ पातळीपासून जागृती केली जात आहे.
भाजपकडून सातत्याने बैठका
मतदारसंघात सुरुवातीपासून भाजप आणि रा. स्व. संघाचा प्रभाव मोठा आहे. याचा लाभ उठविण्यासाठी भाजपनेही लिंगायत उमेदवारच दिला आहे. सातत्याने पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या बैठका घेऊन शेट्टरांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे मोहन लिंबिकाई यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन करताना दिसत आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी दिल्ली दरबारातील नेत्यांनाही हुबळी-धारवाडमध्ये पाचारण केले जात आहे. त्यामुळे यावेळी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे समजण्यासाठी 13 मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
मतदारसंघातील मतदारांची संख्या (अंदाजे)
- लिंगायत व पोटजाती 70 हजार
- मुस्लीम 40 हजार
- अनुसूचित जाती-जमाती 35 हजार
- ब्राह्मण 26 हजार
- इतर 75 हजार
- एकूण 2 लाख 46 हजार