साधनसुविधांच्या तयारीबाबत आयओए समाधानी : ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटन,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी; गेल्या कित्येक वर्षांपासून विविध कारणांमुळे राज्याला हुलकावणी देणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अखेर यंदा आयोजित करण्याचे निश्चित झाले असून ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. या स्पर्धांच्या आयोजनामुळे गोवा आता क्रीडा पर्यटनासाठीही प्रसिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल बुधवारी गोव्यात दाखल झालेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि त्यांचे अन्य पदाधिकारी यांच्यासोबत आपल्या सरकारी निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचीही त्यावेळी उपस्थिती होती.
सर्व पायाभूत सुविधा तयार
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजन करण्यासाठी राज्यात आवश्यक सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत. त्यामुळे आम्ही 23 किंवा 24 ऑक्टोबर रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन केले आहे. तरीही पंतप्रधानांच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास उद्घाटनाची तारीख बदलू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे
उद्घाटन सोहळा फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होईल. त्यानंतर 10 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा चालतील. या स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीनेच गोव्यातील क्रीडापटूंनाही स्थानिक खेळप्रकारात स्वकौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील ’लगोऱ्यो’ सारख्या अनेक पारंपरिक खेळांनाही जगभरातील लोक पाहू शकणार आहेत, असे डॉ. सावंत पुढे म्हणाले. त्यामुळे या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त गोमंतकीय खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्व साधनसुविधांबाबत समाधानी : पी. टी. उषा
यावेळी बोलताना पी. टी. उषा यांनी, क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी राज्यातील साधनसुविधा सज्ज असून प्रत्यक्ष उद्घाटनाच्या तिथीपर्यंत त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे सांगितले. संघटनेच्या तांत्रिक पथकाने क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणांची पाहणी केली असून त्याबाबत आम्ही समाधानी आहोत. आज दि. 27 एप्रिल रोजी अन्य एका पथकाकडून दुसऱ्यांदा पाहणी करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बोलताना सांगतिले की या स्पर्धांसाठी 38 खेळप्रकार निश्चित करण्यात आले असून सर्व ठिकाणे, मैदाने सज्ज आहेत. गोव्यासाठी राष्ट्रीय खेळांचे महत्त्व आणि येथील खेळाडूंना पदक जिंकण्यासाठी तयार करण्यासाठी राज्याने निधीची तरतूद करण्याची गरज यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर खेळाडूंना राष्ट्रीय खेळांमध्ये यश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.









