मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल जाहीर
साखळी : संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधलेल्या साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी साखळी भाजप मंडळाने आपल्या 12 पैकी 10 प्रभागांमधील आपले सर्व उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर व इतरांची उपस्थिती होती. प्रभाग क्र. 1 मध्ये यशवंत माडकर, प्रभाग 2 मध्ये निकीता नाईक, प्रभाग 3 मध्ये सिध्दी पोरोब, प्रभाग 4 मध्ये रश्मी देसाई, प्रभाग 6 मध्ये विनंती पार्सेकर, प्रभाग 7 मध्ये ब्रह्मानंद देसाई, प्रभाग 9 मध्ये दयानंद बोर्येकर, प्रभाग 10 मध्ये आनंद काणेकर, प्रभाग 11 मध्ये दिपा जल्मी व प्रभाग 12 मध्ये अंजना कामत. प्रभाग क्र. 8 मध्ये बिनविरोध निवडून आलेले रियाझ खान हे भाजप पेनलचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपचे साखळीतील खाते हे या पूर्वीच खोलले गेलेले आहे.
सत्ता नसतानाही साखळीचा विकास करून दाखवला : मुख्यमंत्री
भाजपने साखळी मतदारसंघात आणि नगरपालिका क्षेत्रात सत्ता नसतानाही केलेल्या कामांतून आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. याच कामांवर विश्वास ठेऊन साखळीवासीयांनी भाजपच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवावा. यावेळी साखळीत भाजपचाच झेंडा फडकणार अशी खात्री व विश्वास असून तो खरा ठरणार आहे. विरोधी काँग्रेस गट आज साखळीत राहिलेला नाही. त्यांच्याकडे उमेदवारच नसल्याने कुटुंबातील लोकांना अन्य प्रभागांमध्ये उतरविले आहे. साखळीत काँग्रेसचे अस्तित्व राहिले नसल्याने आज त्यांचे कार्यकर्ते भाजपकडे येत आहेत. असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
ट्रिपल इंजिन सरकार चालवण्याची संधी द्या : सदानंद शेठ तानावडे
फोंडा व साखळी येथे निवडणूक होत प्रचाराला प्रारंभ होऊन वेग आलेला आहे. साखळीत एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला असल्याने भाजपच्या विजयाची नांदी झाली आहे. इतर दहा उमेदवारही निवडून येणार अशी खात्री आहे. मुख्यमंत्री साखळीचे असल्याने सर्व उमेदवार निवडून येणार व साखळीत बरे कार्य यापुढे पहायला मिळणार आहे. केंद्रात व राज्यातील डबल इंजिनच्या सरकारमुळे मोठी कामे झालेली आहे त्याचप्रमाणे साखळीत नगरपालिकेवर सत्था आणून ट्रिपल इंजिनचे सरकार चालविण्याची.संधी साखळीवासीयांनी या सरकारला द्यावी, असे आवाहन भाजट प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. त्यासाठी साखळीत नगरपालिकेसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडे न पाहता कोणाच्या नेतृत्वाखाली सदर उमेदवार आहेत ते पहावे. राज्यात प्रत्येक निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला आहे व भाजपला भरघोस यश दिले आहे. त्याचप्रमाणे याही नगरपालिकेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नगरपालिका निवडून द्यावी, असे आवाहन सदानंद तानावडे यांनी केले.









