गोकुळनगर परिसरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांना तुम्मरगुद्दी-सिद्दनहळ्ळी भागातून पाठिंबा वाढला आहे. बुधवारी या भागात हेब्बाळकर यांची प्रचारफेरी काढण्यात आली. त्यांना या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला पाEिठबा दर्शविला. पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधानसभेत पाठविणार असा निर्धार त्यांच्या समर्थकांनी केला आहे. तुम्मरगुद्दी भागात लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रचाराच्या वाहनातून जाताना गल्लीतील काही बालकांना हेब्बाळकर यांनी आपल्या कडेवर घेऊन मायेची सावली दाखवून दिली. ठिकठिकाणी हेब्बाळकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. त्यांच्या प्रचारफेरीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. तुम्मरगुद्दी, सोमनट्टी, भीमगड, करीकट्टी, सिद्दनहळ्ळी या गावांमध्ये हेब्बाळकर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. सर्वांनी त्यांना निवडून आणणार असल्याचे सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा प्रचार करण्यासाठी पूर्व भागातील गोकुळनगर, मुतगा येथे बुधवारी प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नगौडा हट्टीहोळी, शंकरगौडा पाटील, नागेश देसाई, गजानन कणबरकर, पिंटू मल्लवगोळ, श्याम मुतगेकर, दिलीप बसरीकट्टी, महेश सुगण्णावर, रुद्रप्पा मुतगेकर, प्रदीप कारागीर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.









