ग्रामस्थांचा उत्साह शिगेला : भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अलतगे येथील श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेला मंगळवारपासून अमाप उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी अलोट गर्दी केली होती. 75 वर्षांनी यात्रा भरल्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ब्रह्मलिंग हायस्कूलच्या पटांगणावर उभारलेल्या मंडपामध्ये बुधवारी विधिवत पूजनानंतर लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान झाली. मंगळवारी लक्ष्मी मंदिरसमोर सूर्योदयाला 6 वाजून 15 मिनिटांनी श्री लक्ष्मीदेवीचा विवाह संपन्न झाला. यानंतर श्री लक्ष्मीदेवी रथामध्ये विराजमान झाली. सकाळी 9 वाजता देवीचा रथ ओढून मिरवणुकीला सुरुवात झाली. रथात विराजमान लक्ष्मीदेवीच्या विधिवत पूजनानंतर भंडाऱ्याची उधळण व लक्ष्मीदेवीचा जयघोष करत रथ ओढण्याला प्रारंभ झाला. पाटील गल्ली, भरमदेव गल्ली, हवेशीर गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, तानाजी गल्ली परिसरात श्री मरगाई मंदिरजवळ सायंकाळी रथ थांबविण्यात आला. या ठिकाणी रात्रभर जागर भजन व कीर्तन निरुपण कार्यक्रम पार पडले. बुधवारी सकाळी 11 वाजता रथ ओढणीला पुन्हा सुरुवात झाली. रथ हायस्कूल रोड, दत्त मंदिर रोड व गणेशनगर परिसरात फिरून दुपारी 4 वाजता लक्ष्मीदेवीला गदगेवर विराजमान करण्यात आले. यात्रा कमिटीने योग्य नियोजन केले होते. लक्ष्मीदेवी गदगेचा परिसर खेळणी व मनोरंजनाच्या दुकानांनी गजबजल्यामुळे भाविकांना विरंगुळा मिळाला. यात्रेला आलेल्या पै-पाहुणे, मित्र परिवारांचे अलतगेवासियांनी जेवणासाठी योग्य नियोजन केले असून अतिथी देवो भव ही म्हण सार्थ ठरविली जाणार असल्याचे दिसून येत आहे.









