बस थांब्यांची अवस्था दयनीय : स्मार्ट सिटीचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या आदेशामुळे शहरात कामांना वेग

बेळगाव : ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ अशी स्थिती सध्या स्मार्ट सिटींच्या कामांची झाली आहे. स्मार्टसिटीचे काम जूनपर्यंत पूर्ण करावे, असा आदेश आल्याने शहरात सध्या या कामाने वेग घेतला आहे. मात्र एका ठिकाणाचे काम पूर्ण होवून दुसऱ्या कामाला सुरूवात करेपर्यंत आधीच्या कामाची पूर्ण दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. प्रामुख्याने स्मार्ट सिटीच्या कामामध्ये शहरातील बस थांबे कधीच स्मार्ट होणार नाहीत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. त्यातही धर्मवीर संभाजी चौकातील बस थांब्यांची दुरवस्था पाहता स्मार्ट काम करतानाच हा निधी निष्कारण वाया जात आहे. य् ाsथील बस थांब्यांची अवस्था दयनीय आहे. बस थांबे कचऱ्यांनी संपूर्ण भरले आहेत. त्यामध्ये मोकाट जनावरांचा प्रामुख्याने कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून कुत्र्यांनी हे थांबे म्हणजे आपल्या विश्रांतीचे आश्रयस्थान केले आहे. येथे उभारण्यात आलेली दोन स्वच्छतागृहे सध्या बंद आहेत. मुख्य म्हणजे त्याचीही मोडतोड झालेली आहे. त्याच्याच बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
थांब्यांचे छत मोडकळीस
भरीस भर म्हणजे या थांब्यांचे छत मोडकळीला आले असून काही भाग तुटून पडला आहे. आतील वायर्स लोंबकळत आहेत. बाजूला लावलेल्या जाहिरात व सूचना फलकांची मोडतोड झाली असून या थांब्यांमध्ये थांबणे म्हणजे रोगराईला आमंत्रण देणे अशीच परिस्थिती आहे. कॉलेज रोडवरील बस थांब्याची पण अशीच दुरवस्था झाली असून तेथे बसण्याच्या खुर्ची मोडून पडल्या आहेत. असेच चित्र अनेक बस थांब्यांचे आहे. त्यामुळे एकीकडे स्मार्टसिटीच्या निधीमधून बस थांब्यांसह सर्वच शहर चकचकीत करण्याचा झपाटा लावला जातो. परंतु त्या पाठोपाठच या थांब्यांची आणि बहुसंख्य कामाची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे..
…तोपर्यंत शहर स्मार्ट होणे अशक्य
जोपर्यंत नागरिक स्मार्ट होणार नाहीत. तोपर्यंत शहर स्मार्ट होणे अशक्य आहे. कोठेही पान, तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणे, आसनावर पादत्राणे ठेवून बसणे, कोणतेही कोरडे खाल्यानंतर त्याचे रॅपर तेथेच फेकणे ही नागरिकांची सवय झाली आहे. प्रशासनाने किंवा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एखादा सुरक्षारक्षक किंवा पोलीस नेमून शिस्त लावल्याशिवाय बस थांबे स्मार्ट होणार नाहीत.









