कंत्राटदारांचा कानाडोळा : मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने तक्रारी
बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरात विविध विकासकामे राबविण्याचा सपाटा सुरू करण्यात आला. काही विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तर काही अर्धवट अवस्थेत आहेत. मात्र अर्धवट कामे पूर्ण करण्यास निवडणूक असल्याचे कारण देवून काम करण्याकडे कंत्राटदारांनी कानाडोळा केला असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. निवडणुकीत विकासकामाचे गाजर दाखवून मते मिळविण्याचा फंडा आहे. त्यामुळे निवडणुकीवर डोळा ठेवून सहा महिन्यापूर्वी विकासकामे राबविण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला होता. याअंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहर आणि उपनगरात कोट्यावधी निधीची विकासकामे राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेची अडचण येवू शकते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्व विकासकामांचा शुभारंभ करून कामे सुरू करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी गटारीचे बांधकाम, रस्त्याचा विकास, सीडीचे बांधकाम आदी कामे करण्यात येत आहेत. शहर आणि ग्रामीण भागातदेखील विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. थर काही ठिकाणची पूर्णत्वास आली आहेत.
नागरिकांची दिशाभूल
पण निवडणुकीचे कारण देत कंत्राटदारांनी कामे थांबविली असल्याच्या तक्रारी होत आहेत. गटारीचे व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना नागरिकांनी केली असता, निवडणूक आचारसंहिता असल्याने कामे करता येत नसल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
वास्तविक पाहता, निवडणूक आचारसंहिता काळात नवीन विकासकामांची सुरूवात करता येत नाही. पण निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राबविण्यात येणारी कामे पूर्ण करण्यास कोणतीच अडचण नाही. पण निवडणूक आचारसंहितेचे कारण देवून काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे अर्धवट विकासकामे तातडीने पूर्ण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.









