पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागाला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती. याच विषयावर कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुणेकरांना दिलासा मिळाला. पुण्यातील पाणीकपात तूर्तास टळली आहे. 15 मे नंतर धरणसाठय़ांचा आढावा घेऊन पुढील निर्णय होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. पुण्यातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे, असेही पाटील म्हणाले.








